भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोक्सो कलमाअंतर्गत एका गुन्हाचा समावेश आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी २१ एप्रिलला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने रविवारपासून ( २३ एप्रिल ) आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा जंतरमंतर मैदानावर आंदोलन बसले आहेत.
हेही वाचा : “मला मारण्याची धमकी मिळत आहे, याबद्दल पंतप्रधानांना सांगितलं होतं, पण…”, विनेश फोगाटचं विधान
तसेच, सोमवारी ( २४ एप्रिल ) कुस्तीगीर विनेश फोगाटसह अन्य ६ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती.
यावर आज ( २८ एप्रिल ) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा “दिल्ली पोलिसांकडून आजच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,” अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.
त्यानुसार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अल्पवयीन महिला कुस्तीगीरचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोक्सो कलमाअंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अन्य महिला कुस्तीगीरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.