Delhi Red Fort Metro Blast Investigation: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करत असलेल्या एनआयएने उमर नबीच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती कार उमर नबी चालवत होता, हे डीएनए चाचणीतून समोर आले आहे.
एनआयएने म्हटले आहे की, या हल्ल्यात वापरलेली कार ह्युंदाई आय२० होती, जी आमिर रशीद अली याच्या नावावर होती. स्फोटानंतर काही तासांतच जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आमिरला पंपोर येथील त्याच्या घरातून अटक केले होते. नंतर त्याला चौकशीसाठी दिल्लीला आणण्यात आले.
बॉम्बस्फोट घडवणाऱ्या कारचा चालक उमर नबीच्या सहकाऱ्याच्या अटकेबाबत, एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आमिर रशीद अली आहे. दिल्लीतील हल्ल्यात वापरण्यात आलेली ह्युंदाई आय२० कार त्याच्याच नावावर होती.
“तपासातून असे दिसून आले आहे की पंपोरमधील सांबूरा येथील रहिवासी आमिर रशीद अली याने कथित आत्मघाती बॉम्बर उमर उन नबी सोबत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला होता”, असे एनआयए प्रवक्त्याने सांगितले.
एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमिर हल्ल्यात वापरलेली कार खरेदी करण्यासाठी दिल्लीला आला होता. त्यानंतर त्याने ही कार स्फोट घडवण्यासाठी आयईडी म्हणून वापरली.
तपासादरम्यान एनआयएने आणखी एक वाहनही जप्त केले आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणातील पुराव्यांसाठी या वाहनाची तपासणी केली जात आहे. एनआयएने आतापर्यंत ७३ साक्षीदारांची चौकशी केली आहे, ज्यात १० नोव्हेंबरच्या स्फोटात जखमी झालेल्यांचा समावेश आहे.
एनआयएच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, एनआयए दिल्ली पोलीस, जम्मू आणि काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीसांशी समन्वय साधून या प्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा, जम्मू आणि काश्मीरमधील काउंटर इंटेलिजेंस टीमने हरियाणातील एका विद्यार्थिनीची चौकशी केली.
अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीकडे लाल किल्ला मेट्रो स्टेशन बॉम्बस्फोट दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील आरोपी डॉ. आदिल राथेरबद्दल चौकशी करण्यात आली. डॉ. आदिल मेडिकल कॉलेजमध्ये तिचा वरिष्ठ होता.
या तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितले की, काही तासांच्या चौकशीनंतर तिला सोडण्यात आले आहे. तिचा मोबाईल फोन पुढील तपासासाठी काउंटर इंटेलिजेंस टीमने जप्त केला आहे.
