एपी, मियामी : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मियामी न्यायालयात उपस्थित राहिले. अध्यक्षपद सोडल्यानंतर गोपनीय सरकारी कागदपत्रे फ्लोरिडातील आपल्या खासगी निवासस्थानी लपवून ठेवत अनेकदा कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी नाकारला. ‘एबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प या सुनावणीदरम्यान खाली जमिनीकडे रोखून पहात होते.  ट्रम्प यांच्यावर ३७ गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप लावले आहेत. त्यापैकी ३१ गोपनीयतचा भंग झाल्यासंदर्भातील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रम्प यांचे वकील टॉड ब्लांचे यांनी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान भरगच्च न्यायालयात सांगितले, की आम्ही निर्दोष आहोत. न्यायदंडाधिकारी जोनाथन गुडमन यांनी या प्रकरणी ट्रम्प यांनी कोणाही साक्षीदाराशी बोलण्यास मनाई केली. त्यात त्यांचे सहाय्यक वॉल्ट नाऊटा यांचा समावेश आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलांशी संवाद साधला. त्यांच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या मनाईवर आक्षेप घेतला. 

 ‘व्हाईट हाऊस’ने मंगळवारी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. अध्यक्ष बायडेन यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. न्यायालयाबाहेर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार निदर्शने झाली. ट्रम्प यांच्या वाहनांच्या ताफ्याला अडवून ‘अटके’चे चिन्ह दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक करण्यात आली. आरोप फेटाळणारी याचिका दाखल केल्यानंतर ट्रम्प मंगळवारी रात्री न्यू जर्सी गोल्फ क्लब येथे पोहोचले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. ट्रम्प म्हणाले, की हे प्रकरण संबंधितांनी तत्काळ बंद करावे. ते देशाची हानी करीत आहेत.

दोषी ठरले तरी निवडणूक लढवू शकतात, कायदेतज्ज्ञांचे मत

वॉशिंग्टन : लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक रिचर्ड हासेन यांनी ‘सीएनएन’ला सांगितले, की ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला किंवा ते दोषी ठरले तरीही निवडणूक लढवण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही. अमेरिकी राज्यघटनेनुसार अध्यक्षपदाचा उमेदवार जन्माने अमेरिकी नागरिक, किमान ३५ वर्षांचा आणि किमान १४ वर्षे अमेरिका निवासी असणे आवश्यक आहे. इतरही घटनात्मक निर्बंध आहेत. परंतु ते ट्रम्प यांना लागू होत नाहीत. आयोवा विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक डेरेक मुलर यांनीही ‘सीबीएस न्यूज’शी बोलताना सांगितले, की, राज्यघटनेतील तरतूद उमेदवारीवर किंवा निवडणूक जिंकण्यास प्रतिबंध करत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Denied all charges former us president donald trump miami court ysh