Bangladeshi re-enters Delhi within 45 days of deportation : दिल्ली पोलिसांनी एका तृतीयपंथीयाला अटक केली आहे, ज्याला अवघ्या ४५ दिवसांपूर्वी त्यांनी बांगलादेशला परत पाठवलं होतं. या तृतीयपंथीयाने अवैध मार्गाने भारतात घुसखोरी केली होती. तो अनेक वर्षांपासून दिल्लीत राहत होता आणि रस्त्यांवर भीक मागून उदरनिर्वाह करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याला पकडून मायदेशी पाठवलं होतं. मात्र, अवघ्या दीड महिन्यात तो परत भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो केवळ घुसखोरी करून थांबला नाही तर त्याने परत दिल्ली गाठली. दिल्लीत तो आधी जिथे राहत होता तिथेच परत राहू लागला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्याला परत अटक केली आहे. तसेच अवैधरित्या घुसखोरीच्या आरोपाखाली या तृतीयपंथीयाबरोबर आणखी सहा जणांना अटक केली आहे. सुहान खान (३०) असं या तृतीयपंथीयाचं नाव आहे जो दिल्लीमधील शालीमार बाग परिसरात भीक मागत होता. पोलिसांनी ३० जून रोजी या भागात छापेमारी केली होती. त्यामध्ये सुहानला अटक करण्यात आली आहे.
दीड महिन्यात सीमा ओलांडून थेट दिल्ली गाठली
दिल्ली पोलिसांनी मे महिन्यात दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये छापेमारी करून ३०० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. यापैकी काहींना मे महिन्याच्या अखेरीस, तर काहींना जूनच्या पहिल्या आठवड्यात हिंडन एअरबेसवरून एका विमानाद्वारे त्रिपुरामधील अगरतळा येथे नेण्यात आलं. तिथून त्यांना बांगलादेशी सीमेपलीकडे सोडण्यात आलं. मात्र, त्यांच्यापैकी सुहानने परत दिल्ली गाठली आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर परत पाठवण्यात आलेले बांगलादेशी नागरिक आणि काही नव्या बांगलादेशी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्ली पोलिसांनी सुहान खानला १५ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे (FRRO) सोपवण्यात आलं होतं. पोलिसांनी सांगितलं की बांगलादेशला डिपोर्ट केल्यानंतर सुहानने मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचं नाटक सुरू केलं. त्यानंतर काही दिवस तो त्रिपुराच्या सीमेजवळ हिंडत राहिला. याचदरम्यान एके दिवशी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याने पुन्हा एकदा सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला. त्याने अगरतळा ते दिल्ली असा प्रवास केला. दिल्लीत आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तो पुन्हा एकदा शालीमार बाग येथे गेला. जिथे तो पूर्वी राहत होता तिथेच राहू लागला. याच परिसरात भिक मागू लागला.