आजारी असल्याचे कारण देऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला शुक्रवारी दांडी मारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहतील, असा दावा पक्षाच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात येत होता तरीही अडवाणी यांनी शनिवारच्या बैठकीला दांडीच मारली. अडवाणी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याची पक्षाच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नव्या भूमिकेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूचित केले जात होते. मात्र अडवाणी यांनी बैठकीला गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे मोदी यांच्या नावाला आपला ठाम विरोध असल्याचेच दर्शवून दिले, अशी चर्चा सुरू आहे.
लालकृष्ण अडवाणी बैठकीच्या सांगता समारंभाला उपस्थित राहतील याबाबतही अनिश्चिततेचे वातावरण आहे. मोदी यांच्याकडे सोपविण्यात येणाऱ्या भूमिकेवरून भाजपमध्ये दोन तट पडले आहेत. त्यामुळेच उमा भारती, जसवंत सिंग आदी ज्येष्ठ नेते बैठकीला गैरहजर राहिल्याचे सांगण्यात येत आहे.