DMK MP Kanimozhi slam BJP MP Anurag Thakur said Thankfully such people are not leaders in Tamil Nadu : भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या हिमाचल प्रदेशमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. यावेळी ठाकूर यांनी हनुमान हा पहिला अंतराळवीर होता असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यांच्या या विधानावरून डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारचे नेते तमिळनाडूमध्ये नाहीत हे सुदैव असल्याचेही त्या म्हणाल्या.

अनुराग ठाकूर यांच्या विधानाबाबत बोलताना कनिमोझी म्हणाल्या की “जर तुम्ही लहान मुलांना चंद्रावर सर्वप्रथम कोण गेले, असे विचारले तर ते म्हणतील की नील आर्मस्ट्राँग. मात्र, उत्तरेकडील काही नेते आपल्या लोककथांमधील आजी किंवा हनुमान यांनी सर्वात आधी चंद्रावर पाऊल ठेवले असा दावा करू शकतात. सुदैवाने, अशा प्रकारचे लोक तमिळनाडूमध्ये नेते नाहीत,” असे विधान त्यांनी मदुराई येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलताना ठाकूर यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर जोरदार टिका झाली होती. यावेळी त्यांनी पौराणिक कथा आणि विज्ञानाचे मिश्रण करत विधान केले होते. यावेळी त्यांनी इंग्रजांनी दिलेल्या पुस्तकांच्याही पुढे शिक्षकांनी गेले पाहिजे असे अवाहन केले होते.

नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एका कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुराग ठाकूर शालेय विद्यार्थ्यांशी संवाद होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की, “अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते?” या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की, “नील आर्मस्ट्राँग.” दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरानंतर अनुराग ठाकूर यांनी म्हटलं की, “मला वाटतं की हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते.”