Donald Trump Advice to Russia Ukraine War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (२० ऑक्टोबर) रशिया-युक्रेन युद्धावर मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “युक्रेनच्या डोनबास प्रदेशाचं विभाजन करून त्याचा मोठा भाग रशियाच्या ताब्यात देणं आवश्यक आहे. तसं केल्यास चार वर्षांपासून चालू असलेलं युद्ध थांबवता येईल.” अमेरिकन हवाई दलाच्या एअर फोर्स वन या विमानातून प्रवास करत असताना ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, डोनबास प्रदेश जसा आत्ता विभागलेला आहे तसाच राहू द्या. दोन्ही बाजूंनी लढाई थांबली पाहिजे. दोन्ही बाजूच्या लष्करांनी आता घरी परतलं पाहिजे आणि लोकांचा जीव घेणं थांबवलं पाहिजे.”

रशिया व युक्रेनमध्ये चार वर्षांपासून युद्ध चालू आहे. रविवारी युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे दक्षिण रशियाच्या ऑरेनबर्ग गॅस संयत्राला आग आगली. रशियन सरकारची कंपनी गॅझप्रोमचा हा गॅस प्रकल्प असून जगातील सर्वात मोठ्या गॅस संशोधन केंद्रापैकी एक आहे. रशियन अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की ड्रोन हल्ल्यात संयंत्राच्या एका भागाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे कझाकस्तानकडून येणाऱ्या गॅसवरील प्रोसेसिंग युनिटमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. यावर ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “युक्रेनला शांततेसाठी काही जमीन सोडावी लागेल.”

रशिया युक्रेनचा काही भूभाग नक्कीच घेईल : ट्रम्प

याआधी देखील ट्रम्प यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीवेळी ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला होता की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनचा भूभाग न घेता युद्ध समाप्त करण्यासाठी तयार होतील का? यावर ट्रम्प म्हणाले होते की “नाही, कारण ते काही भाग नक्कीच घेतील. आम्ही (अमेरिका) त्याबाबतीत उदार आहोत. अमेरिका एकटाच असा देश आहे जो युद्ध जिंकूनही भूभाग वगैरे न घेता मागे हटतो.”

विशेष म्हणजे या मुलाखतीच्या काही वेळ आधी ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन व युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली होती. त्यामुळे ट्रम्प यांच्या या वक्तव्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच ट्रम्प यांनी मुलाखतीवेळी सांगितलं की “या आठवड्यात माझी आणि पुतिन यांची बुडापेस्टमध्ये भेट होऊ शकते.”

दरम्यान, यूक्रेनने रशियाच्या अनेक ऊर्जा संयंत्रांवर ड्रोन हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे रशियाकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.