Howard Lutnick hints changes in H-1B visa : अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी एच-१बी व्हिसा प्रक्रियेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच घोषणा केली होती की एच-१बी व्हिसासाठी आता एक लाख डॉलर्सचं शुल्क आकारलं जाईल. या शुल्काची अंमलबजावणी होण्याआधी यात काही बदल होणार असल्याचं लुटनिक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सध्याची व्हिसा प्रक्रिया चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या व्हिसावर कमी खर्चात तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंबासह अमेरिकेत येण्याची परवानगी दिली जाते.

लुटनिक यांनी न्यूजनेशनला सांगितलं की “ही प्रक्रिया फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. परंतु, माझ्या अंदाजानुसार फेब्रुवारी २०२६ पर्यंत यात मोठे बदल होणार आहेत.” डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा अर्जासाठी आणि व्हिसा नुतनीकरणासाठी १,००,००० डॉलर्स इतकं शुल्क लागू केलं आहे. त्यानंतर व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं की हे नवीन शुल्क विद्यमान व्हिसाधारकांकडून आकारलं जाणार नाही. ते कोणत्याही शुल्काशिवाय अमेरिकेत ये-जा करू शकतात. नवीन शुल्क केवळ नव्या अर्जदारांसाठी असेल.”

एच-१बी व्हिसाबाबात पुढे विचारपूर्वक बदल केले जातील : लुटनिक

डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसावरील शुल्कवाढीची घोषणा केली तेव्हा लुटनिक हे ओव्हल कार्यालयात ट्रम्प यांच्यामागे उभे होते. त्यावेळी लुटनिक म्हणाले होते की “एच-१ बी व्हिसावरील एक लाख डॉलर्सचं शुल्क हे प्रत्येक व्हिसासाठी वार्षिक शुल्क आहे. यामध्ये नुतनीकरण व पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्यांचा समावेश असेल.” दरम्यान, एच-१बी व्हिसाबाबात पुढे विचारपूर्वक बदल केले जातील आणि हेच मला अपक्षित आहे असं लुटनिक म्हणाले आहेत.

लुटनिक म्हणाले, “एच-१बी व्हिसासाठीच्या लॉटरी प्रणालीवर आम्ही काम करत आहोत. यासंबंधी काही प्रश्न आहेत जे आम्ही फेब्रुवारी २०२६ पर्यंत सोडवले जातील. या व्हिसासाठी एक लाख डॉलर्स इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. सध्याच्या स्थितीत अमेरिकेतील प्रवेशासाठी ते कायम असेल.

मुळात एच-१ बी व्हिसा ही एक लॉटरी असल्याचंही लुटनिक यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले, “जगातील दोन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या चर्चेवेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की कामासाठी अमेरिकेत येणाऱ्या तंत्रज्ञांसाठी लॉटरी लावणं थोडं विसंगत आहे. आता आम्ही यावर विचार करत आहोत.”