Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बुधवारी ८ देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले आहेत. यामध्ये सर्वाधिक ब्राझिलवर ५० टक्के टॅरिफ लादण्यात आला आहे. ट्रम्प यांच्याकडून लावण्यात आलेले हे कर ‘अन्याय्य व्यापारी असमतोल’ सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे म्हटले आहे. ब्राझील बरोबरच अल्जेरिया, ब्रुनेई, इराक, लिबीया, मोल्डोवा, फिलीपिन्स आणि श्रीलंका या देशांवर देखील नव्याने व्यापारी कर लावल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. या सर्व देशांमध्ये सर्वाधिक कर हा ब्राझीलवर लादण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या आणि परदेशी नेत्यांना पत्रांद्वारे पाठवलेल्या निर्देशांमध्ये अल्जेरिया, इराक, लिबिया आणि श्रीलंका यांच्यावर ३० टक्के, ब्रुनेई आणि मोल्डोवावर २५ टक्के आणि फिलीपिन्सवरती २० टक्के कर लावण्यात आला आहे.

तर या नवीन टॅरिफनुसार, ब्राझीलहून आयात होणाऱ्या मालावर ५० टक्के कर लादण्यात आला आहे. हे कर १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ब्राझीलमध्ये सध्या देशाचे माजी अध्यक्ष बोलसोनारो यांच्याविरोधात खटला सुरू आहे आणि अमेरिकेने लादलेला टॅरिफ हा काही अंशी त्याच्या निषेध नोंदवण्यासाठी म्हणून लावण्यात आला आहे. तसेच ५० टक्के टॅरिफ हे सेक्टोरल टॅरिफपेक्षा वेगळे असेल.

यामध्ये एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या १० टक्के टॅरिफमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, ट्रम्प यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, ही वाढ दोन्ही देशांमधील अन्याय्य व्यापारी संबंधांमुळे करण्यात आली आहे. सोमवारी ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपान येथून आयात होणार्‍या सर्व मालावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, त्यानंतर पुन्हा काही देशांवर टॅरिफ लादण्यात आले आहेत.

सोमवारी करण्यात आलेल्या घोषणेनंतर, जपान, दक्षिण कोरिया आणि दक्षिम आफ्रिका यांच्यासह १४ देशांना पत्र पाठवण्यात आले आहे, ज्यामद्ये २५ टक्के ते ४० टक्क्यांपर्यंत आयात शुल्काची रूपरेषा देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी जपान (२५ टक्के), दक्षिण कोरिया (२५ टक्के), म्यानमार (४० टक्के), लाओस (४० टक्के), दक्षिण आफ्रिका (३० टक्के) कझाकिस्तान (२५ टक्के) आणि मलेशिया (२५) टक्के शुल्क लादण्यात आले आहे. अशीच पत्रे ट्युनिशिया, बांगलादेस, इंडोनेशिया, कंबोडिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, सर्बिया आणि थायलंड सारख्या देशांना देखील पाठवण्यात आले आहेत, ज्यांच्यावर २५ टक्के ते ३६ टक्क्यांच्या दरम्यान शुल्क लादण्यात आले आहे.

ट्रम्प यांचे २० देशांवर ट्रॅरिफ अस्त्र

ट्रम्प यांनी ही कारवाई १४ देशांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर करण्यात आली आहे. या नोटीसा त्या देशांना पाठवण्यात आल्या होत्या ज्यांच्यावर व्यापारी घाटा वाढवल्याचा आणि अमेरिकन निर्यातीत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्य७ डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ वाढवण्याचा अजेंड्याअंतर्गत आतापर्यंत २० देशांवर टॅरिफ लादण्यात आले आहेत.

ट्रंम्प यांच्याकडून एप्रिल महिन्यात रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि त्यांचे ट्रेड पार्टनर्स यांच्यात व्यापारी करारांवर चर्चा सुरू आहेत. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की १ ऑगस्ट २०२५ पासून सर्व निर्धारित टॅरिफ लागू होतील.

तसेच त्यांनी यामध्ये कोणताही बदल होणार नाही असेही स्पष्ट केले होते. ब्रिक्स समूह ज्यामध्ये भारत आणि चीन यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर निशाणा साधत ट्रम्प यांनी आरोप केला होता की, ब्रिक्सचा उद्देश अमेरिकेचे नुकसान करणे आणि डॉलर कमकुवत करणे हा आहे. ब्रिक्स देशांतून येणाऱ्या उत्पादनांवर १० टक्के टॅरिफ लावला जाईल. ट्रम्प म्हमाले होते की ब्रिक्समध्ये जे देश आहेत त्यांना १० टक्के टॅरिफ द्यावा लागेल