Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वर्षांपूर्वीचं धोरण बदलत बुधवारी हे सांगितलं की माझे समकक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पुतिन यांनी युद्ध कैद्यांची सुटका आणि युक्रेनशी युद्ध थांबवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. यासाठी ते चर्चा करायला तयार आहेत असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरु असलेलं युक्रेन रशिया युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं आहे?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की मी लवकरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार आहे. ही भेट रशियात होईल की अमेरिकेत होईल हे अद्याप ठरणं बाकी आहे. तसंच या दोन नेत्यांच्या चर्चेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सहभागी होतील की नाही हे देखील अद्याप निश्चित नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली हे ट्रम्प यांनीच स्पष्ट केलं आहे.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनचे सल्लागार लित्विन यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जो बायडेन यांचं धोरण ट्रम्प यांनी बदललं

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी फेब्रुवारी २०२२ यमध्ये रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला केला त्यानंतर इतर युरोपियन देशांप्रमाणे युक्रेनच्या नाटो सदस्यात्वाला पाठिंबा दिला होता. याबद्दलचं धोरण ट्रम्प यांनी बदललं आहे. या धोरणाबाबतही ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. रशियाने तीन वर्षांपूर्वी कैदैत टाकलेल्या मार्क फोजेल यांच्या सुटकेसंदर्भात पुतिन यांच्याशी चर्चा केली. कैद्यांची अदलाबदली कऱण्यास पुतिन यांनी सहमती दर्शवली आहे असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. फोजेल यांची रशियाने सुटका केल्यानंतर रशियन नागरिक आलेक्झांडर विन्निकचीही तुरुंगातून अमेरिका सुटका करणार आहे असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.

अमेरिका युक्रेनला मदत करणार का?

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी रशिया-युक्रेन प्रकरणाच्या अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत जनरल कीथ केलॉग (निवृत्त) यांच्यासह म्युनिक या ठिकाणी होणाऱ्या संमेलानत सहभागी होणार आहेत. दरम्यान अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी असं म्हटलं आहे की युक्रेनची सुरक्षेची जबाबदारी युरोपियन देशांची असेल. हेगसेथ असंही म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांची हीच इच्छा आहे की युक्रेनला लष्कर वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठीची जबाबदारी युरोपियन देशांनी घ्यावी. याचाच दुसरा अर्थ अमेरिका युक्रेनला सहकार्य करणार नाही असा होतो. अमेरिकेचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump begins push for negotiated end to ukraine war in call with putin scj