US Vs Canada : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही महिन्यांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक देशांवर टॅरिफ लादलं आहे. त्यानंतर आता युक्रेनमध्ये शांतता करार करण्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प हालचाली करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर रशियाच्या ऊर्जा व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या घडामोडी सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला मोर्चा आता कॅनडाकडे वळवला असून कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापाराच्या वाटाघाटी अचानक स्थगित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

कॅनडाबरोबरच्या व्यापार वाटाघाटी का स्थगित केल्या?

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी घोषणा केली की ते कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापार वाटाघाटी स्थगित करत आहेत. कॅनडाने अमेरिकेच्या शुल्कांना विरोध करणाऱ्या टीव्ही जाहिरातींशी संबंधित घृणास्पद वर्तन केलं असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये ओटावामधील जाहिरातींद्वारे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ‘अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी शुल्क खूप महत्वाचं आहे’, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचा रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध

युक्रेनमध्ये शांतता करारासाठी रशियावर दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले. डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ही कारवाई करण्याची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर रशियाच्या ऊर्जा व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.