Russia-Ukraine War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आधी त्यांनी अलास्का येथे व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली आणि नंतर युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करत त्यांच्याशी चर्चा केली. आता तर ते दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणणार आहेत. मात्र रशिया-युक्रेनचा संघर्ष थांबविण्यासाठी भारताचे नाक दाबले गेल्याचे आता समोर आले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटले की, युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी आणि रशियावर दबाव टाकण्यासाठी भारतावर टॅरिफ सारखे निर्बंद लादले गेले.
युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियाचे तेल आयात करून भारतातील कंपन्यांनी मोठा नफा कमावला, असा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला होता. त्यानंतर लेविट यांची टिपणी समोर आली आहे. त्या म्हणाल्या की, भारतावर निर्बंध लादल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ट्रम्प यांची भेट घेतली.
पत्रकार परिषदेत बोलत असताना लेविट म्हणाल्या, “रशिया-युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचंड दबाव निर्माण केला. त्यांनी भारतावर निर्बंध लादले आणि इतरही काही महत्त्वाची पावले उचलली.” यापुढे जाऊन लेविट म्हणाल्या की, रशियावर आणखी दबाव वाढविण्यासाठी ट्रम्प यांनी दुय्यम कर लादण्याचीही तयारी केली होती.
ट्रम्प यांना लवकर युद्ध संपवायचे आहे
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हे युद्ध समाप्त होताना पाहायचे आहे. त्यासाठी ते शक्यत तितके प्रयत्न करत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये बैठकीसाठी आलेले युरोपियन नेते, नाटोचे महासचिव यांनीही ट्रम्प यांच्या या प्रयत्नांशी सहमती दर्शवली. आता रशिया आणि युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष एकत्र बसून चर्चा करण्यास तयार झाले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. ट्रम्प यांना हेच अपेक्षित होते, असेही लेविट म्हणाल्या आहेत.
त्यांनी पुढे असेही म्हटले की, मी खात्रीने सांगू शकते की, यूए सरकार आणि ट्रम्प प्रशासन रशिया आणि युक्रेनमधील द्वीपक्षीय संबंध चांगले करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.
ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युद्ध सुरूच झाले नसते
ट्रम्प बायडेन यांच्या ऐवजी अध्यक्ष असते तर रशिया-युक्रेन युद्ध झाले असते का? असा प्रश्न लेविट यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबद्दल अनेकदा भूमिका मांडली आहे. ते जर राष्ट्राध्यक्ष पदावर असते तर हे युद्ध सुरूच झाले नसते. पुतिन यांनीही हे मान्य केले आहे.