Donald Trump : युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. रविवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या पक्षाकडून एक विधेयक सादर केले जाईल, ज्यामुळे कोणत्याही देशाला रशियाबरोबर व्यापार करणे कठीण होईल.

ट्रम्प यांच्या मते रशियाचे व्यापार भागीदार देश, विशेषतः रशियाकडून ऊर्जेची आयात करणारे देश हे युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धाला पाठबळ देण्यास जबाबदार आहेत. “रिपब्लिकन्स असा कायदा घेऊन येत आहेत, जो रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर खूप कठोर निर्बंध, इत्यादी लादेल,” असे ट्रम्प फ्लोरिडामधून निघतेवेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

भारत आणि चीनचा यादीत समावेश

असे कठोर निर्बंध लादले जाणार अशा देशांच्या यादीत भारत आणि चीन यांचा समावेश देखील आहे. रशियाबरोबर व्यापारी संबंध सुरूच ठेवलेल्या या दोन देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आधीपासूनच टीका करत आले आहेत. तसेच ट्रम्प यांनी यापूर्वीच भारत आणि चीन या देशांना रशियाच्या युक्रेनविरोधातील युद्धाला पैसा पुरवणारे प्रमुख देश घोषित केले आहे.

असे असले तरी अमेरिकेने चीनला फक्त धमक्या दिल्या आहेत, चीनवर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्याउलट रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याच्या मुद्द्यावर भारतीय मालाच्या आयातीवर दंड म्हणून २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले. ज्यामुळे भारतीय मालावरील एकूण टॅरिफ ऑगस्ट महिन्यात ५० टक्के झाले.

या यादीत भारत आणि चीन यांची नावे जवळपास निश्चित मानली जात असताना, ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, कदाचित ते या यादीत इराणचा समावेश करण्याचाही विचार करू शकतात.

डोनाल्ड ट्रम्प अधिक निर्बंध आणि टॅरिफ लादण्याचा विचार करत असताना, दुसरीकडे शुक्रवारी त्यांनी बीफसह २० फूड प्रॉडक्ट्सवरील टॅरिफ हटवले आहे. वाढत्या किराणा मालाच्या किमतीमुळे ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे टॅरिफ हटवल्याने भारताला दिलासा मिळाला आहे. कारण ट्रम्प यांनी टॅरिफ दुप्पट केल्यानंतर भारतातील चहा, कॉफी, मसाले आणि काजू निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

भारत-रशिया व्यापार वाढला

दुसरीकडे भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार आणखी वाढला आहे. दोन्ही देशांनी रविवारी, २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार हा १०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा निर्धार व्यक्त केला आणि भारत-युरेशियन इकॉनॉमिक युनियन (EAEU) फ्री ट्रेड कराराच्या पुढील टप्प्यांचा आढावा घेतला.

अमेरिकेच्या विधेयकात काय आहे?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, हे विधेयक जर मंजूर झाले तर जे देश रशियाकडून ऊर्जा उत्पादनांची आयात करत आहेत आणि युक्रेनला पाठिंबा देत नाहीयेत, अशा देशांवर ट्रम्प यांना ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादता येईल.

यापूर्वी ट्रम्प यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्यास संकोच दाखवला होता, कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्याबरोबर शांतता आणि युक्रेनबरोबर युद्धबंदी करार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पण आता या चर्चा फिस्कटल्याने, रशियाला शांतता करार करण्यासाठी भाग पाडता यावे याकरिता ट्रम्प हे या विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत आहेत.