Donald Trump praises Shehbaz Sharif and Asim Munir : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागच्या काही काळापासून सातत्याने चर्चेत राहिले आहेत. नुकतेच ट्रम्प हे रविवारी कंबोडिया आणि थायलंड यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, यानंतर त्यांनी आता अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प क्वालालंपूर येथे होत असलेल्या आसियान (Association of Southeast Asian Nations) च्या शिखर परिषदेत दाखल झाले आणि लगेचच कंबोडिया-थायलंड करार यांच्यातील शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

“मी ऐकलं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या संघर्ष सुरू झाला आहे, पण मी तो लगेचच सोडवेण. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आणि पंतप्रधान चांगली लोकं आहेत,” असे ट्रम्प म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “आम्हाला गाझा शांतता कराराचा अभिमान आहे. आम्ही कंबोडियाबरोबर व्यापार करार आणि थायलंडसोबत क्रिटीकल मिनरल्स (critical minerals) करार देखील करत आहोत. माझ्या प्रशासनाने आठ महिन्यांत संपवलेल्या आठ युद्धांपैकी हे एक आहे. इतिहासात असे कधीही झालेले नाही. या शांतता करारामुळे लाखो लोक आज जिवंत आहेत. युद्धांपेक्षा व्यापाराला मी अधिक प्राधान्य देतो.”

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची प्रतिक्रिया काय आहे?

पाकिस्तानी वरिष्ठ सूत्रांनी सांगितेल की ते ट्रम्प यांचे वक्तव्याचा बारकाईने निरीक्षण करत आहेत. जो बायडन प्रशासनाच्या काळात झालेल्या धोरणात्मक दुर्लक्षानंतर अमेरिकेचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी याकडे एक राजकीय संधी संधी म्हणून पाहिले जात आहे.

“फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख जाणीवपूर्वक केल्याचे दिसून येत आहे. असीम मुनीर यांचे नाव घेणे हा व्हाईट हाऊसला जीएक्यू बरोबर करार करायचा असून इस्लामाबादबरोबर नाही याचा संकेत आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

यादरम्यान तालिबानच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, जर अमेरिका पुन्हा काबूलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल ते सावधगिरी बाळगत आहेत. “काबूलला भीती आहे की ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील मध्यस्थी ही अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाऐवजी पाकिस्तानच्या सुरक्षेकडे झुकू शकते. तसेच ड्युरंड लाईनचा आणि पाकिस्तानविरोधी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या घटकांना आश्रय देणे या मुद्द्यांवर अमेरिका काबूलला माघार घेण्यास सांगेल, अशी भीती काबूलला वाटते आहे,” असे त्यांनी सांगितले. यासंबंधीचे वृत्त न्यूज१८ने दिले आहे.

अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्ष

पाकिस्तानने कथितपणे ९ ऑक्टोबर रोजी काबूल येथे एअर स्ट्राइक केली. टीटीपी तळांना लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला. पाकिस्ताने २०२१ पासून शेकडो पाकिस्तानी सैनिकांना मारणाऱ्या टीटीपी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप तालिबानवर केला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटला आहे.

तालिबानने पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देत सीमेवर मोठा हल्ला केला, ज्यामध्ये ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि २० सुरक्षा चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सौदी अरेबिया आणि कतार यांच्या मध्यस्थीमुळे काही काळासाठी संघर्ष थांबवण्यात आला. पण तो पुन्हा पेटला. अखेर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात १९ ऑक्टोबर रोजी शस्त्र विरामावर एकमत झाले. अफगाणिस्तानने बुधवारी जाहीर केले की ते पूर्ण युद्धविरामासाठी आणि संघर्ष पाकिस्तानबरोबर चर्चा करून सोडवण्यासाठी तयार आहेत.