Donald Trump on India Pakistan War : मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं या वक्तव्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक प्रकारचा जप चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत ३० हून अधिक वेळा युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. प्रत्येक वेळी नवनवा मसाला लावून ट्रम्प तोच दावा पुन्हा पुन्हा करत आहेत. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी तेच वक्तव्य केलं आहे. यावेळी ट्रम्प म्हणाले, “मी त्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जबरदस्त माणसाशी बोलत होतो. परंतु, मी त्यांना व पाकिस्तानला भरमसाठ आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही देशाच्या समजुतदार राष्ट्रप्रमुखांनी योग्य निर्णय घेतला.”
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी त्यांना सांगितलं की भारत व पाकिस्तानने युद्ध थांबवलं नाही तर मी इतकं आयात शुल्क लागू करेन की तुमचं डोकं चक्रावून जाईल.” बुधवारी (२७ ऑगस्ट) व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ट्रम्प म्हणाले की “मी भारताला भरमसाठ टॅरिफ लागू करण्याची धमकी दिली होती. मी त्यांना म्हटलं की जोवर तुमचा वाद थांबत नाही तोवर ट्रेड डीलवर (व्यापार करार) चर्चा होणार नाही, आपण यात पुढे जाणार नाही.”
ट्रम्प व मोदी यांच्यात काय बोलणं झालं?
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणालो की तुमच्यात आणि पाकिस्तानमध्ये काय चाललंय… तेव्हा खूप जास्त तणाव होता. दोन्ही देशांमध्ये जे काही चाललंय ते गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. परंतु, आत्ता जे चाललंय ते थांबवा. मी त्यांना म्हटलं, असंच चालू राहिल्यास मला तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा व्यापार करार करायचा नाही. तुम्ही दोघे अणू युद्धाच्या दिशेने जात आहात. मी त्यांना सांगितलं, उद्या तुम्ही मला पुन्हा फोन करा. परंतु, आम्हाला तुमच्याशी व्यापार करार करायचा नाही. किंवा आम्ही तुमच्यावर इतकं आयात शुल्क लादू की तुम्हाला भोवळ येईल. त्यानंतर जवळपास पाच तासांत सगळं चित्र बदललं.”
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की “कदाचित भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष होऊ शकतो. पण मला नाही माहिती की तसं होईल की नाही. बऱ्याचदा वाटतं की कदाचित तसं पुन्हा होणार नाही. मला नाही वाटत की पुन्हा युद्ध होईल. परंतु, पुन्हा तसं झालंच तर मी ते युद्ध थांबवेन. आपण अशा गोष्टी घडू देऊ शकत नाही.”