Donald Trump on TIME Magazine cover : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ‘टाइम’ मासिकाच्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर याबद्दल पोस्ट लिहिली असून हा आजपर्यंतचा त्यांचा सर्वात खराब फोटो असल्याचे म्हटले आहे.
इजिप्तमधील शर्म अल शेख (Sharm El Sheikh) येथून मंगळवारी परतत असताना ट्रम्प यांनी या कव्हर फोटोबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फोटोमध्ये त्यांचे केस गायब करण्यात आले असून त्यांच्या डोक्यावर अतिशय लहान मुकुटासारखी तरंगणारी काहीतरी वस्तू दिसत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.याबरोबरच आपल्याला खालच्या कोनातून फोटो काढणे कधीच आवडले नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्प काय म्हणाले आहेत?
जरी ट्रम्प यांनी फोटोवर टीका केली असली तरी त्यांनी यामध्ये लिहिलेल्या लेखाचे कौतुक केले आहे. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, “टाइम मासिकाने माझ्याबद्दल एक तुलनेने चांगला लेख लिहिला आहे, पण फोटो आतापर्यंतच्या सर्वात वाईट फोटोंपैकी एक ठरू शकतो. त्यांनी माझे केसच ‘गायब’ केले आहेत आणि माझ्या डोक्यावर तरंगणारे काहीतरी आहे, जे एका तरंगणाऱ्या मुकुटासारखे दिसते, पण ते अतिशय लहान आहे. खरोखरच विचित्र! मला खालच्या कोनातून फोटो काढणे कधीच आवडले नाही, पण हा एक खूपच वाईट फोटो आहे आणि त्यावर टीका होणे योग्य आहे. ते नेमकं काय करत आहेत आणि का?”
या लेखात कशा प्रकार ट्रम्प प्रसासनाने गाझा येथे युद्धबंदी करण्यासाठी मध्यस्थी केली. तसेच यामध्ये विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि सल्लागार जॅरेड कुशनर यांच्या जगातील सर्वात अस्थिर संघर्ष थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, गाझामधील जिवंत इस्रायली ओलिसांना तसेच काही पॅलेस्टिनी बंधकांना सोडण्यात आले आहे. हा करार ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी ठरू शकतो असे टाइमने म्हटले आहे.
ट्रम्प इस्रायलमध्ये उतरले तेव्हा टाईम मासिकाने हे कव्हर प्रसिद्ध केले. दरम्यान इस्रायलमध्ये ट्रम्प यांनी कैदेतून सोडलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि नेसेट (Knesset) म्हणजेच इस्रायलच्या संसदेला संबोधित केले. त्यानंतर ते इजिप्तमधील शर्म अल-शेख परिषदेसाठी इजिप्त येथे गेले. या परिषदेचा उद्देश गाझा येथील युद्धबंदीला पाठिंबा देणे, शत्रुत्व संपवणे आणि पॅलेस्टिनी प्रदेशांमध्ये गव्हर्नन्स आणि रिकन्स्ट्रक्शन यासाठी दीर्घकालीन धोरण निश्चित करणे हा होता.
इस्रायलच्या संसदेत ट्रम्प यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे आयोजित गाझा शांतता शिखर परिषदेत बोलताना इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी यांनी देखील त्यांचे कौतुक केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा शांतता प्रस्ताव ही पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेवटची संधी आहे असे मत अबेदल-फतेह अल सिसी यांनी सोमवारी नमूद केले.
इस्रायल-हमास युद्धविरामाचा एक भाग म्हणून आवश्यक अटीची पूर्तता सोमवारी करण्यात आली. हमासने इस्रायलच्या २० ओलिसांची सुटका केली. इस्रायलनेही १९०० पॅलेस्टिनी युद्धकैद्यांची सुटका केली आणि गाझामध्ये मदतीचे रस्ते मोकळे केले. इस्रायलच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ट्रम्प यांना सातत्याने उभे राहून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.