Donald Trump Shouts Volodymyr Zelenskyy Russo-Ukrainian War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत मोठा तणाव निर्माण झाला होता. फायनॅन्शियल टाइम्सच्या (एफटी) अहवालानुसार या बैठकीवेळी ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यासाठी झेलेन्स्की यांच्यावर रशियाच्या सर्व अटी स्वीकारण्याचा दबाव टाकला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी झेलेन्सकी यांना इशारा दिला की “युक्रेनने रशियाच्या अटी मान्य केल्या नाहीत तर पुतिन (रशियाचे अध्यक्ष) युक्रेनला नष्ट करतील.”
दोन्ही नेत्यांमधील चर्चेवेळी तणाव वाढला होता. झेलेन्स्की हे युक्रेनची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असताना ट्रम्प झेलेन्स्की यांच्यावर ओरडत होते. ट्रम्प बराच वेळ झेलेन्स्की यांच्यावर अरेरावी करत होते. तसेच ट्रम्प यांनी युक्रेनच्या शिष्टमंडळाने सादर केलेला युद्धक्षेत्राचा नवा नकाशा देखील फेटाळत टेबलावर फेकून दिला.
ट्रम्प व झेलेन्स्की यांच्या काय चर्चा झाली?
एफटीने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की या बैठकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने पू्र्व डोनबास क्षेत्र रशियाला सोपवावं यासाठी वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकला. यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी झेलेन्स्की यांच्यासमोर या बैठकीच्या आदल्या दिवशी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला.
ट्रम्प म्हणाले, “युक्रेनच्या डोनबास प्रदेशाचं विभाजन करून त्याचा मोठा भाग रशियाच्या ताब्यात देणं आवश्यक आहे. तसं केल्यास चार वर्षांपासून चालू असलेलं युद्ध थांबवता येईल.”
युक्रेनने अखेर ट्रम्प यांना सध्याच्या घडील्या दोन्ही देश जिथे आहेत तिथे थांबावं या मतावर राजी केलं. त्यानंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवावं आणि जिथे आहेत तिथेच राहावं असं म्हटलं आहे. या वृत्ताशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी रॉयटर्सने व्हाइट हाऊसशी संपर्क साधला. परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ट्रम्प-झेलेन्स्की भेटीचं मुख्य कारण काय?
रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेनकडे पुरशी शस्त्रास्रे नाहीत. त्यामुळे शस्त्रास्रे मिळावी यासाठी झेलेन्स्की व्हाइट हाऊस भेटीवर गेले होते. यामध्ये युक्रेनने ट्रम्प यांच्याकडे टॉमहॉक क्षेपणास्रांची देखील मागणी केली. अशा क्षेपणास्रांची युक्रेनला प्रचंड आवश्यकता आहे. मात्र, या बैठकीवेळी ट्रम्प यांनी युक्रेनला शस्त्रास्र पुरवण्यात रस दाखवला नाही. त्यांनी शांतता करारावर अधिक जोर दिला. ते म्हणाले, “मला युद्ध थांबवण्यात मध्यस्थी करण्यात अधिक रुची आहे कारण शांतता गरजेची आहे.”