Donald Trump Spoil Relation with India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्काराच्या हव्यासापोटी भारताबरोबरचे ४० वर्षांपासूनचे असलेले संबंध बिघडवले, अशी टीका अमेरिकेतील ज्येष्ठ डेमोक्रॅटिक नेते रहम इमॅन्युएल यांनी केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानप्रती दाखवत असलेल्या सहानुभूतीवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ट्रम्प यांचा मुलगा पाकिस्तानकडून पैसे मिळवत आहे, असाही दावा त्यांनी केला.

इमॅन्युएल हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे माजी सहकारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन असताना जपानमध्ये राजदूत म्हणून काम करत होते. त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले की, पाकिस्तानबरोबर शस्त्रविरामासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या, असे पंतप्रधान मोदी कधीही म्हणाले नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांनी ४० वर्षांपासून धोरणात्मक पद्धतीने भारताबरोबर दृढ केलेले संबंध अहंकारापोटी बिघडवले आहेत.

भारतावर अमेरिकेने सध्या ५० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवरून शस्त्रविराम करण्यात आला. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा भारताने आजवर मान्य केलेला नाही.

मात्र डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा करत आहेत. मी भारत आणि पाकिस्तानला २०० टक्के आयातशुल्क लावण्याची धमकी दिली आणि त्यांनी व्यापारासाठी युद्ध थांबवले, असे डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत किमान ५० वेळा तरी बोलले आहेत. कालच त्यांनी याच वाक्याची पुनरावृत्ती केली.

पाहा डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा व्हिडीओ –

रहम इमॅन्युएल यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, चीनच्या विरोधात उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत एक प्रमुख अस्त्र ठरले असते. तसेच लष्करी बाजूही भक्कम झाली असती.

पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ४० वर्षांपासून अमेरिकेने भारताशी धोरणात्मक पद्धतीने वाढविलेले संबंध अशरक्षः वाया घालवले. फक्त डेमोक्रॅटिकच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये रिपब्लिकन प्रशासनानेही भारताबरोबरचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला होता, असेही रहम इमॅन्युएल म्हणाले आहेत.

इमॅन्युएल पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा आणि त्यांचा त्यांचे सहाय्यक स्टीव्ह विटकॉफ यांना पाकिस्तानकडून मिळालेल्या पैसा आणि ट्रम्प यांच्या अहंकारामुळे भारताबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत.