अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांचा विरोध धुडकावून लावत अव्वाच्या सव्वा टॅरिफ लादले. काही देशांवर जास्त तर काही देशांवर कमी. भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ लागू केले होते. तेव्हा भारत व अमेरिकेच्या मैत्रीचे दाखलेही ट्रम्प वारंवार देत होते. पण अचानक रशियाकडून तेलखरेदीवर आक्षेप घेत भारतावरही दुप्पट म्हणजे ५० टक्के टॅरिफ आकारण्यात आले. ट्रम्प यांनी असाच हट्टीपणा इतरही देशांच्या बाबतीत दाखवला. परिणामी अनेक देशांचा माल अमेरिकेत भरमसाठ किमतींनिशी दाखल होत आहे. आणि याचे परिणाम अमेरिकन नागरिकांनाच भोगावे लागत आहेत. येल युनिव्हर्सिटीनं आपल्या ताज्या अहवालात याबाबत धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवर लागू केलेल्या टॅरिफमुळे अमेरिका सरकारच्या तिजोरीत परकीय धनाची गंगाजळी वाढली असली, तरी त्यामुळे अधिकाधिक अमेरिकन नागरिक दरिद्री होणार असल्याचं येल युनिव्हर्सिटीच्या ताज्या अहवालातून समोर आलं आहे. सीएनएनच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचे परिणाम…

येल विद्यापीठाच्या बजेट लॅबद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे २०२६ पर्यंत अमेरिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या गरीब नागरिकांमध्ये तब्बल ८ लाख ७५ हजार अतिरिक्त नागरिकांची भर पडणार आहे. या गरीबांमध्ये ३ लाख ७५ हजार लहान मुलांचा समावेश आहे. यासाठी संशोधकांनी दारिद्र्य मापन निकषांचा वापर केला.

मंगळवारी जाहीर झालेल्या या अहवालाच्या निष्कर्षांनुसार, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेतील अल्प उत्पन्न गटाला बसणार आहे. या गटातील अमेरिकन नागरिक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा रोजच्या वापरातील वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च करतात. याशिवाय, याच गटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर विदेशातून आयात झालेला मालही खरेदी करतात. कारण हा माल तुलनेनं स्वस्तात उपलब्ध होतो. पण ट्रम्प यांच्या धोरणामुळे आधी स्वस्तात मिळणारा माल आता भरमसाठ किमतीला मिळू लागला आहे. त्यामुळे या मालाच्या उत्पादकांना आणि पर्यायाने अमेरिकेतील गरीब जनतेला ट्रम्प यांच्या धोरणाचा मोठा फटका बसू शकतो.

यासंदर्भात बजेट लॅबचे जॉन रिको म्हणतात, “हे टॅरिफ म्हणजे एकप्रकारे अमेरिकन नागरिकांवरील करच आहे. कारण टॅरिफ हे उत्पन्नावरील कर नसून वस्तूंवरील कर आहेत. जे लोक बचतीपेक्षा वस्तू खरेदी करण्यावर त्यांच्या उत्पन्नाचा अधिकांश भाग खर्च करतात, त्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल.” या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, टॅरिफ धोरण लागू झाल्यामुळे अमेरिकेतील एकूण गरिबीमध्ये १०.४ टक्क्यांवरून १०.७ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

शतकातील सर्वात मोठी टॅरिफ वाढ

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातली गेल्या जवळपास १०० वर्षांतली सर्वात मोठी टॅरिफ वाढ इतर देशांवर लागू केली आहे. त्यांचं एवढ्यावरच समाधान होत नसून आणखीन टॅरिफ लादण्याचा मानसही ते वारंवार बोलून दाखवतात. विशेषत: जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात, अशा देशांवर अतिरिक्त टॅरिफची धमकीच डोनाल्ड ट्रम्प देतात. १९३५ पासूनच्या टॅरिफचा विचार केला असता अमेरिकेकडून इतर देशांवर लागू केल्या जाणाऱ्या टॅरिफचं प्रमाण जवळपास १७.४ टक्क्यांनी वाढलं आहे.

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला न्यायालयात आव्हान

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आततायी टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्याच न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. कनिष्ठ न्यायालयाने ट्रम्प यांना या टॅरिफ धोरणामुळे धारेवर धरल्यानंतर आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांची याबाबतची बाजू ऐकून घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, एकंदरीत ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला खुद्द अमेरिकेतूनही विरोध होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.