Donald Trump On Hamas : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. एवढंच नाही तर ट्रम्प सातत्याने वेगवेगळे दावे करताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी भारत व पाकिस्तान संघर्षाबाबतही त्यांनी वेगवेगळे दावे करत भारत-पाकिस्तानमधील संघर्ष आपण थांबवल्याचं त्यांनी म्हटलं होतं, अर्थात त्यानंतर हे दावे भारताने फेटाळून लावले.

त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल आणि हमासमध्ये गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी कार्यक्रम देखील ठरवला आहे. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी २० कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच हा २० कलमी युद्धबंदीचा प्रस्ताव हमासने स्वीकारण्यासाठी ट्रम्प दबाव निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान करत हमासला धमकी दिली आहे. पुढील ३-४ दिवसांत शांतता प्रस्ताव स्वीकारा, अन्यथा दुःखद अंत असेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता हमास काय भूमिका घेणार? ट्रम्प यांचा २० कलमी युद्धबंदीचा प्रस्ताव हमास स्वीकारणार का? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“हमासला त्यांच्या २० कलमी शांतता प्रस्तावाला प्रतिसाद देण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा अवधी आहे. ७२ तासांच्या आत हमासकडून ओलिसांची सुटका, हमासचे नि:शस्त्रीकरण आणि इस्रायलने गाझामधून हळूहळू माघार घ्यावी. यावर इतर सर्व पक्षांनी स्वाक्षरी केली. आम्ही फक्त हमासची वाट पाहत आहोत. सर्व अरब देशांनीही स्वाक्षरी केली. सर्व मुस्लिम देशांनी स्वाक्षरी केली. इस्रायलने स्वाक्षरी केली. आम्ही फक्त हमासची वाट पाहत आहोत. हमास या प्रस्तावाला प्रतिसाद देणार की नाही? ते पाहू. जर असं झालं नाही तर त्याचा शेवट खूप दुःखद असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

२० कलमी प्रस्तावात काय आहे?

इंडियन एक्स्प्रेसनंच्या वृत्तानुसार, या प्रस्तावातील तरतुदी गाझा प्रशासनानं मान्य करण्यावर युद्धबंदी अवलंबून असेल. त्यात प्रामुख्याने गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांना जिवंत अथवा मृत ७२ तासांत इस्रायलच्या हवाली करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तसेच, आगामी काळात हमासचा गाझाच्या प्रशासनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल, असंही नमूद करण्यात आलं आहे.

ट्रम्प यांनी मांडलेला हा २० कलमी प्रस्ताव त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन गाझा उभारण्याच्या उद्देशाचा एक भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्या मध्यस्थांना या मुद्द्यांवर दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा करण्यास सांगण्यात आलं आहे.