Donald Trump Warning to kill Hamas : इस्रायल व हमासमध्ये दोन वर्षांपासून चालू असलेलं युद्ध गेल्या आठवड्यात थांबलं होतं. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. यासह हमासने ओलीस नागरिकांना मुक्त करण्यास व इस्रायलने त्या बदल्यात युद्धकैद्यांना मुक्त करण्यास सुरुवात केली. अशातच हमासने इस्रायलला मदत करणाऱ्या काही लोकांना ठार केलं आहे. यामध्ये पॅलेस्टिनींची संख्या अधिक आहे. काही माध्यमांनी दावा केला आहे की हमासने शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही सामान्यांचा बळी घेणं चालू ठेवलं तर आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरणार नाही. आम्ही गाझामध्ये घुसून हमासच्या जवानांना ठार करू.
गेल्या आठवड्यात इस्रायल व हमासमध्ये युद्धबंदी व ओलिसांना मुक्त करण्यासंदर्भात करार लागू झाला होता. तेव्हापासून गाझामधील अंतर्गत हिंसाचाराकडे दुर्लक्ष झालं आणि त्यानंतर तिथल्या हत्यांशी संबंधित वृत्त समोर आलं. त्यावरून ट्रम्प यांनी हा गंभीर इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या पाठिंब्यासह इस्रायल हमासवर हल्ला करणार?
ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गाझामध्ये अमेरिकेच्या थेट लष्करी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे आणि ट्रम्प यांचं नवं वक्तव्य हमाससाठी मोठा इशारा असल्याचं मानलं जात आहे. युद्धविरामासाठी वाटाघाटी करत असताना अमेरिकेने हमासला बजावलं होतं की कराराच्या अटींचं उल्लंघन झालं तर अमेरिका इस्रायलच्या नवीन हल्ल्यांना पाठिंबा देईल. आता हमासने अटींचं उल्लंघन केल्यामुळे इस्रायल हमासचा बिमोड करण्यासाठी पुन्हा एकदा गाझा पट्टीत हल्ला करू शकतो आणि त्यास अमेरिका पूर्ण पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
गाझामध्ये सैन्य उतरण्याची अमेरिकेची योजना नाही : अमेरिका
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी रविवारी एनबीसीच्या मीट दी प्रेसमध्ये सांगितलं की “गाझामध्ये जमिनीवर सैन्य उतरवण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नाही. तर, इस्रायलमध्ये २०० अमेरिकन सैनिक हे केवळ युद्धविरामाच्या अटींचं निरीक्षण करण्यासाठी तैनात केले जात आहे.” व्हॅन्स यांनी हे वक्तव्य रविवारी (१२ ऑक्टोबर) केलं होतं. तर, हमासने गुरुवारी युद्धविरामाचा नियम मोडला आहे. त्यामुळे अमेरिका आपल्या योजनेत बदल करू शकते.