Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत देशाच्या इतिहासात प्रथमच ‘स्व-निर्वासन’ कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांना मोफत विमान तिकिटे आणि प्रोत्साहन रक्कम देऊन स्वेच्छेने त्यांच्या देशात परतण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले आहे की, देशात राहणारे जे बेकायदेशीर स्थलांतरित त्यांच्या मायदेशात जाण्याचा निर्णय घेतील त्यांना १००० अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक मतद देणार आहेत. याचबरोबर त्यांच्या विमान प्रवासचा खर्च देखील अमेरिकन प्रशानसन करणार आहे.

व्हाईट हाऊसच्या वेबसाइटवरील निवेदनात, ट्रम्प यांनी स्थलांतरितांवर टीका केली. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांनी आक्रमण केले असल्याचा आरोप केला.

आम्ही ठरवू त्या ठिकाणी आणि आम्ही ठरवू त्या पद्धतीने…

अमेरिकेत राहणाऱ्या सर्व बेकायदेशीर परदेशी नागरिकांनी आत्ताच मोफत उड्डाण बुक करावे. अन्यथा आम्ही ठरवू त्या पद्धतीने आणि आम्ही ठरवू त्या प्रकारे शिक्षा भोगावी लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“जो परदेशी नागरिक स्वतःहून हद्दपार होणार नाही, त्याला मोठा आर्थिक दंड, मालमत्ता जप्त करणे, वेतन जप्त करणे, तुरुंगवास आणि आम्ही ठरवू त्या ठिकाणी आणि आम्ही ठरवू त्या पद्धतीने अचानक हद्दपारी करण्यात येईल”, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

अमेरिका सोडणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना आर्थिक मदत

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर आश्वासन दिले होते की, “जो बेकायदेशी प्रवासी स्वत:हून अमेरिका सोडेल त्याला आर्थिक मदत आणि ते जिथून आले आहे तिथे परतण्यासाठी एका सुंदर विमान प्रवासाची व्यवस्था करणार आहोत.”

होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी सोमवारी स्पष्ट केले होते की, “त्यांचा विभाग एक कार्यक्रम सुरू करणार आहे. ज्याद्वारे जे बेकायदेशी स्थलांतरित माघारी जातील याची सीबीपी अॅपद्वारे पुष्टी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात एक हजार अमेरिकन डॉलर्स आर्थिक मदत म्हणून पाठवले जातील.”