Donald Trump warning to american courts : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी इंटरनॅशनल एमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स अॅक्ट (IEEPA) कमकुवत न करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी अमेरिकन न्यायालयांना एक गंभीर इशारा देखील दिला आहे. IEEPA हा कायदा शीतयुद्धाच्या काळातील असून याचा वापर ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर शुल्क लादण्याचे समर्थन करण्यासाठी केला आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या निर्णयामुळे देशाला प्रचंड आर्थिक फायदा होत असल्याचा दावा केला आहे.
टॅरिफचा शेअर बाजारावर प्रचंड सकारात्मक परिणाम होत आहे. जवळपास प्रत्येक दिवशी नवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. याबरोबच देशाच्या तिजोरीत शेकडो अब्ज डॉलर्स येत आहेत, असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
यावेळी ट्रम्प यांनी इशारा दिला की ‘रॅडिकल लेफ्ट कोर्टाने’ जर आयईईपीएच्या वापराच्या विरोधात निर्णय दिला तर याचा अर्थव्यवस्थेवर भयानक परिणाम होतील. इतकेच नाही तर १९२९ ची महामंदी पुन्हा एकदा येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. देशाच्या आर्थिक विकासाच्या गतीला धोका होऊ नये यासाठी असा निर्णय खूप आधीच या प्रकरणाच्या सुरूवातीलाच घ्यायला हवा होता, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
अशा ‘ज्युडिशीयल ट्रॅजडी’मधून अमेरिका सावरण्याची कसलीही शक्यता नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. मात्र यावेळी त्यांनी अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. देशाला यश आणि महानता मिळायला हवी, गोंधळाची स्थीती, अपयश आणि अपमान नाही, असेही ट्रम्प पोस्टच्या अखेरीस म्हणाले आहेत.
IEEPA काय आहे?
IEEPA हा कायदा शीतयुद्धाच्या काळात लागू करण्यात आला होता. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाल्यानंतर याच्या माध्यमातून जागतिक व्यापाराच्या नियंत्रणासाठी राष्ट्राध्यक्षांना व्यापक स्वरूपातील अधिकार मिळतात. ट्रम्प यांनी IEEPA या कायद्याचा उपयोग करत राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देऊन अनेकदा व्यापार निर्बंध लादले आहेत.
सध्या IEEPA अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या अधिकारांच्या व्याप्तीची कायदेशीर छाननी केली जात आहे, यादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. अनेक कायेदेशीर तज्ज्ञांचे मत आहे, की या कायद्याचा वापर हा व्यापार धोरणात मूळ हेतूपेक्षा खूप जास्त केला जात आहे. याला न्यायलयात आव्हान देखील दिले जात आहे.
त्यांचे म्हणणे आहे की हा कायदा दीर्घ काळासाठी ‘ट्रेड टूल’ म्हणून वापरासाठी तयार करण्यात आलेला नव्हता. याबरोबरच याचा वापर करून काँग्रेसच्या परवानगिशीवाय टॅरिफ लागू करणे हे संवैधानिक ‘चेक्स अँड बॅलन्सेस’चे उल्लंघन ठरू शकते.
१९२९ सालची महामंदी
ग्रेट डिप्रेशन म्हणजेच महामंदी ही अमेरिकन शेअर बाजार केसळण्यापासून १९२९ साली सुरू झाली होती. अधुनिक इतिहासातील सर्वात गंभीर आर्थिक संकटांपैकी हे एक होते. या काळात अनेक बँका कोशळल्या, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरली आणि औद्योगिक निर्मिती आणि जागतिक व्यापारात मोठी घसरण झाली होती. १९३३ पर्यंत अमेरिकेत जवळपास एक चतुर्थांश लोक हे बेरोजगार होते आणि ९००० हून अधिक बँका बंद पडल्या होत्या.