U S President Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे सूत्र हाती घेतल्यापासून ते जगभरात चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन घेत असलेल्या निर्णयांनतर जगभरात अनेक घडामोडी घडल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्यात मध्य पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडून सर्वात महागडी भेट वस्तू मिळणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडून एक सुपर लक्झरी बोईंग ७४७-८ जंबो जेट भेट म्हणून देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त एबीसीच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प हे विमान त्यांच्या नवीन एअर फोर्स वन विमान म्हणून वापरण्याची योजना आखत आहेत. माहितीनुसार हे विमान जगातील सर्वात अलिशान खासगी विमानांपैकी एक आहे. ट्रम्प हे तात्पुरतं राष्ट्रपती जेट म्हणून वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विमान युनायटेड स्टेट्स एअर फोर्सकडे हस्तांतरित केलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राष्ट्रपतींच्या विमानासाठी आवश्यक असलेल्या अमेरिकन लष्करी वैशिष्ट्यांची पूर्तता करण्यात येतील.

तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर हे विमान ट्रम्प प्रेसिडेंशियल लायब्ररी फाउंडेशनकडे हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांना कतार भेटीदरम्यान ही भेटवस्तू मिळणार असल्याचं वृत्त आहे. तसेच ट्रम्प यांच्या कतार दौऱ्यादरम्यान ते सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा त्यांचा पहिलाच विस्तारित परदेश दौरा असेल.

कतार औपचारिक घोषणा करेल का?

दरम्यान, ट्रम्प या तीन दिवसांच्या मध्य पूर्व दौऱ्यावर असताना कतार या लक्झरी भेटवस्तूबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, हे जेट सुरुवातीला अमेरिकन हवाई दलाला दिले जाईल. जेणेकरून लष्करी शाखा राष्ट्रपतींच्या प्रवासाच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल करू शकतील.