Donald Trump On Vladimir Putin Meet : रशिया-युक्रेनमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही सुरू आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे, तर युक्रेनही जशास तसं उत्तर देत आहे. रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आलेलं नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट २०२५ रोजी अमेरिकेच्या अलास्कामध्ये भेट झाली.
या भेटीत रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा निघण्याची अपेक्षा होती. मात्र, या भेटीत कोणताही निर्णय झाल्याचं दिसत नाही. व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. रशियाबाबत मोठी प्रगती होत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. “रशियाबाबत मोठी प्रगती, संपर्कात रहा”, असं सूचक भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मात्र, अधिक तपशील त्यांनी दिले नाहीत.
रशिया-युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत वॉशिंग्टन डीसी येथे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि युरोपीयन नेत्यांबरोबरच्या भेटीच्या एक दिवस आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी ही टिप्पणी केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी शुक्रवारी अलास्का येथील हवाई तळावर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट तीन तासांहून अधिक काळ चालली. तसेच यावेळी झालेल्या शिखर परिषदेदरम्यान कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांनी शस्त्रसंधी न करता थेट शांतता करार करावा, यासाठी वाटाघाटी करणाऱ्यांसाठी चर्चा करावी, यावर माझे आणि पुतिन यांचं एकमत झालं असून यामुळे युद्ध लवकरच संपेल. केवळ शस्त्रसंधी अनेकदा टिकत नाही, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन करार नाहीच
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का शिखर परिषदेतील भेट युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कोणत्याही कराराशिवाय संपली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांची आणि व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यासोबत उभे राहून व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं की, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प जर व्हाइट हाऊसमध्ये राहिले असते, तर युक्रेनमधील युद्ध सुरूच झाले नसते, असे त्यांना वाटते. “आज, जेव्हा ट्रम्प म्हणतात की जर ते २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते आणि मला खात्री आहे की हे खरे आहे. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असं पुतिन यांनी म्हटलं.