Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मधली त्यांची सेक्रेटरी कॅरोलीन लेविट बाबत एक विधान केलं आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर नेटकरी त्यांची तुलना थेट बिल क्लिंटन यांच्याशी केली आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. कॅरोलीनबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान ऐकून नेटकरी विविध कमेंटही करु लागले आहेत.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “कॅरोलीनचा चेहरा, तिचं डोकं ज्या प्रकारे चालतं आणि ओठ ज्या प्रकारे हलतात असं वाटतं एखादी मशीनगन सुरु झाली आहे. ती एक स्टार आहे. ती एक मस्त व्यक्ती आहे. ज्या कुणाकडे इतकी सुंदर प्रेस सेक्रेटरी असेल तो माणूस का चांगलं काम करणार नाही? कॅरोलीनने सुंदर काम केलं आहे.” असं म्हटलं आहे. कॅरोलीनबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे आता सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यावर टीका होते आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत नेटकरी काय म्हणत आहेत?

कॅरोलीन बाबत ट्रम्प यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना अनेक लोक बिल क्लिंटन यांच्याशी करत आहेत. एक युजर म्हणतो डोनाल्ड ट्रम्प जे बोलत आहेत ते ऐकून मोनिका लेवेन्स्की प्रकरण आठवलं आहे. १९९० मध्ये मोनिका लेवेन्स्की प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी बिल क्लिंटन यांच्यावर मोनिकाने अनेक आरोप केले होते. आणखी एका युजरने म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्युटी पेजेंट्समध्ये मार-ए-लागो क्लबचे स्पा, जेफरी एपस्टीन सारखे जेट आणि इतर अनेक गोष्टी अशा मुलींना खुश करण्यासाठी वापरल्या असतील. डोनाल्ड ट्रम्प हा एक भीतीदायक म्हातारा आहे. त्याला स्वतःलाही कळतंय का तो काय बोलतोय? अशीही एक कमेंट एका युजरने केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

कॅरोलीन लॅवेट कोण आहे?

कॅरोलीन ही न्यू हॅम्पशायरची मूळ रहिवासी आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत तिने डोनाल्ड ट्रम्प यांची सहाय्यक प्रेस सचिव म्हणून काम केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा २०२० मध्ये पराभव झाला. त्यानंतर कॅरोलीनने रिपब्लिकन प्रतिनिधी एलिस स्टेफनिक यांच्यासाठी काम केलं. २०२२ मध्ये कॅरोलीनने निवडणूकही लढवली आहे. सध्या ती व्हाईट हाऊसची प्रेस सचिव म्हणून काम करते आहे. तिच्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं आहे.