Muhammad Yunus on Attacks on Hindus in Bangaldesh: बांगलादेशमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर तेथील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत होत्या. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “बांगलादेशमधील हिंदूंनी ‘मी हिंदू आहे, माझे रक्षण करा’, असे म्हणू नये. त्यांनी धर्माच्या आधारावर संरक्षणासाठी आवाहन करण्यापेक्षा आम्ही बांगलादेशी नागरिक आहोत. आमच्या हक्कांचे रक्षण करा, असे म्हणायला हवे”, असे विधान मोहम्मद युनूस यांनी केले आहे. तसेच भारत ही खोट्या बातम्यांची जननी आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोहम्मद युनूस यांना बांगलादेशीमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत असताना त्यांनी आपली भूमिका मांडली. २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुखपद मोहम्मद युनूस यांच्याकडे देण्यात आले. बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले.

सत्ताबदल झाल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले वाढल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सदर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे परराष्ट्र धोरणाची पुनर्रचना करत असताना मोहम्मद युनूस यांना या प्रश्नाला अनेकदा सामोरे जावे लागत आहे.

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या युनूस यांनी सातत्याने फेटाळून लावल्या आहेत. हिंदूंविरोधात हिंसाचार होत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असे ते म्हणाले.

हिंदूंवरील अत्याचाराच्या बातम्या खोट्या

पत्रकार मेहदी हसन यांनी युनूस यांना हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रश्न विचारला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हिंदूंवर वाढत्या अत्याचाराबाबत विधान केले होते, असा प्रश्न त्यांनी विचारला. मोहम्मद युनूस यांनी मात्र सदर प्रश्नच बिनलागू असल्याचे म्हटले. “सर्वप्रथम मी या सर्व खोट्या बातम्या फेटाळून लावतो. या बातम्यांवरून निष्कर्ष काढणे योग्य नाही”, असे युनूस यांनी सांगितले.

भारताकडून फेक न्यूज पसरविल्या जातात

पत्रकार हसन यांनी जमावाने हिंदूंवर केलेले हल्ले, मंदिरांची तोडफोड आणि धार्मिक ध्वज फडकवल्याबद्दल हिंदू भिक्षूला अटक केल्याच्या घटनांचा उल्लेख केला. तेव्हाही युनूस यांनी हा प्रश्न फेटाळून लावला. “भारताची एक खासियत म्हणजे फेक न्यूज. त्यांच्याकडून खोट्या बातम्यांचा भडिमार सुरू असतो”, अशी टीका युनूस यांनी केली.

मोहम्मद युनूस पुढे म्हणाले, मी जेव्हा केव्हा बांगलादेशमधील हिंदू समुदायाला भेटतो, तेव्हा त्यांना हेच सांगतो की, तुम्ही हिंदू आहात ही ओळख सांगणे थांबवा आणि मी बांगलादेशी नागरिक आहे, माझे रक्षण करा, असे म्हणा. तुम्ही स्वतःला वेगळे करू नका. तुम्ही नागरिक म्हणून तुमचे हक्क मागा.

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ३० हजार हिंदूंनी राजधानी येथे मोर्चा काढून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल आणि छळाबद्दल संरक्षण मिळण्याची मागणी केली होती. हिंदू नेत्यांवर दाखल केलेले देशद्रोहाचे आरोप मागे घेण्याची विनंती या मोर्चात करण्यात आली होती. तसेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर बांगलादेश आणि भारतातील हिंदू समुदायातून रोष व्यक्त करण्यात आला होता.

यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या समर्थकांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. मोहम्मद युनूस अल्पसंख्याकांचा छळ करत असल्याचा आरोप या मोर्चातून केला गेला. तसेच युनूस पाकिस्तानी आहेत, त्यांनी पाकिस्तानात परत जावे, अशा घोषणाही निदर्शकांनी केल्या.