UP Crime News: ज्या तरुणीच्या मृत्यूमुळे तिचा पती आणि सासरच्या लोकांवर दोन वर्षांपासून हुंडाबळीचा खटला सुरू आहे, ती तरुणी आता जिवंत सापडली आहे. ही २० वर्षीय तरुणी २०२३ मध्ये उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील तिच्या सासरवाडीतून बेपत्ता झाली होती. काही महिने शोध घेऊनही ती ती सापडली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबाने सासरच्या लोकांवर, हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, तिच्या पती आणि सासरच्या सहा लोकांविरुद्ध हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा खटला गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथक याचा तपास करत होते. त्यांनी या तरुणीला मध्य प्रदेशात शोधून काढले.

औरैयाचे मंडल अधिकारी अशोक कुमार सिंह म्हणाले, “विवाहानंतर दीड वर्षांनी ही महिला बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार, पती आणि तिच्या सासरच्या काही लोकांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.”

ते पुढे म्हणाले, “या प्रकरणाचा तेव्हापासून तपास सुरू होता आणि आम्हाला या तरुणीला मध्य प्रदेशात शोधण्यात यश आले. तिला बुधवारी औरैया येथे परत आणण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे.”

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही तरुणी मध्य प्रदेशात काय करत होती आणि तिने इतके दिवस तिच्या कुटुंबाशी किंवा सासरच्या लोकांशी संपर्क का केला नाही याचा तपास करत आहेत. “याचा न्यायालयातील खटल्यावर निश्चितच परिणाम होईल”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.