एका ३० वर्षीय महिलेची तिच्या नवऱ्याने हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह दिल्लीतल्या स्मशानभूमीत पुरला. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत याचा संशय पतीला आल्याने त्याने कृत्य केलं. दृश्यम चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच या माणसाने त्याच्या पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरुन ठेवला. आता ही बाब उघडकीस आली आहे. आपली पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली आहे हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र या प्रकरणात या माणसाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

शादाब अली या ४७ वर्षीय पेंटरने त्याची पत्नी फातिमाची मेहरुली येथील जंगलात हत्या केली. फातिमाचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय शबीब अलीला होता. त्याने फातिमाची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह त्याने दिल्लीतल्या एका स्मशानभूमीत पुरला. तिच्या मृतदेहावर असलेले कपडे कालव्यात फेकले. शदाबला या दुष्कृत्यात शाहरुख खान, तन्वीर आणि आणखी एकाने साथ दिली. शादाब अली हा मूळचा उत्तर प्रदेशातील अमरोहाचा आहे. पोलीस उपायुक्त अनिकेत चौहान यांनी याबाबतची माहिती दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलीस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं?

अनिकेत चौहान यांनी सांगितलं की आरोपींनी फातिमाचा मृतदेह कारने दिल्ली येथील स्मशानभूमीत आणला त्यानंतर तो पुरला. फातिमाची हत्या करण्याआधी तिला विषारी पेय पाजण्यात आलं होतं. तसंच झोपेच्या गोळ्याही देण्यात आल्या होत्या. आपण पकडले जाऊ नये म्हणून शादाब आणि शाहरुख यांनी फातिमाच्या फोनवरुन स्वतःला अमरोहा या ठिकाणी येऊन टेक्स्ट मेसेज केला. तसंच ती तिच्या प्रियकरासह पळाली आहे असाही बनाव रचला. मात्र १० ऑगस्टला ही घटना उघडकीस आली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

१० ऑगस्टला नेमकं काय घडलं?

१० ऑगस्टला फातिमाच्या मैत्रिणीने तक्रार दाखल केली. तिने सांगितलं की फातिमाचं अपहरण करुन तिला ओलीस ठेवलं गेल्याचा संशय तिला आहे. तिने पुरावा म्हणून एक सीसीटीव्ही फुटेजही दाखवलं. ज्यात फातिमाचा नवरा, त्याचे काही मित्र आणि फातिमा दिसत होते. मात्र या फुटेजमध्ये फातिमा बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी नेमकं काय घडलं आहे याचे पैलू तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांनी शादाबला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याने कानावर हात ठेवत मला यातलं काही ठाऊक नाही असं म्हणत थाप मारली. मात्र नंतर त्याने आपण फातिमाची हत्या केल्याची कबुली दिली आणि तिचा मृतदेह कालव्यात फेकल्याचंही सांगितलं. तपासात दिशाभूल व्हावी यासाठी तो खोटं बोलला. अखेर कसून चौकशी करण्यात आली तेव्हा शादाबने गुन्हा कबूल केला.

फातिमाची १ ऑगस्ट रोजी हत्या

फातिमाला १ ऑगस्ट रोजी मारण्यात आलं. तिला मृत्यूच्या आधी कोल्ड ड्रींकमधून विष आणि झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह दिल्लीतल्या स्मशानभूमीत पुरला अशी कबुली शादाब अलीने दिली.