वादग्रस्त केंद्रीय मंत्री पी. के. बन्सल आणि अश्वनी कुमार यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संयुक्तपणे घेतल्याचे स्पष्टीकरण रविवारी काँग्रेसतर्फे देण्यात आले. तसेच मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय केवळ पक्षाच्या अध्यक्षांनीच घेतल्याच्या आरोपाचेही खंडन केले.
मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. मात्र या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बन्सल आणि कुमार यांनी मंत्रिमंडळात राहण्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर दोघांनी शुक्रवारी उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही मंत्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जवळचे मानले जातात.
दरम्यान, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याप्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या दोन सहकाऱ्यांना सोनिया गांधी यांनी वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचे सांगत पंतप्रधानांना कोणतेही अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी आपल्या ब्लॉगवरून केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dropping of ashwani kumar pawan bansal collective decision of pm and sonia