एपी, अंकारा : तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सोमवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.६ इतकी होती. तीन आठवडय़ांपूर्वी या देशात आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे हा प्रदेश उद्ध्वस्त झाला आहे. सोमवारच्या भूकंपामुळे काही आधीच नुकसान झालेल्या इमारती कोसळल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली वडील व मुलगी अडकल्याची माहिती मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र मलात्या प्रांतातील येसिल्युर्ट शहरात होते, असे देशाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले. येसिल्युर्टचे महापौर मेहमेट सिनार यांनी ‘हॅबरतुर्क टेलिव्हिजन’ला सांगितले, की शहरातील अनेक इमारती कोसळल्या. ज्यात एका चार मजली इमारतीचा समावेश आहे. येथे वडील व मुलगी अडकले आहेत. सिनार यांनी सांगितले, की, ते दोघे सामान गोळा करण्यासाठी नुकसानग्रस्त इमारतीत गेले होते.

मालत्यामध्ये शोध व बचाव पथके इमारतीच्या ढिगाऱ्यावरून जात असताना भूकंपाचा धक्का बसला. या पथकातील काही जण खाली थांबवलेल्या मोटारींवर कोसळले. ६ फेब्रुवारी रोजी दक्षिण तुर्कस्तान व उत्तर सीरियाच्या काही भागांना ७.८ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्यात प्रचंड हानी झालेल्या तुर्कीच्या ११ प्रांतांमध्ये मालत्याचा समावेश होता.

दहा हजार भूकंपोत्तर धक्के

तुर्कस्तान, सीरियात भूकंपामुळे ४८ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानमधील एक लाख ७३ हजार इमारती कोसळल्या आहेत. अनेक इमारतींचे गंभीर नुकसान झाले आहे. तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले, की ६ फेब्रुवारीपासून भूकंपामुळे प्रभावित झालेल्या प्रदेशात सुमारे दहा हजार भूकंपोत्तर धक्के बसले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake again in turkey some more buildings were destroyed ysh