भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची संबलपूर येथे तपासणी केल्यावरून निवडणूक आयोगाने बुधवारी ओदिशात निरीक्षक म्हणून नेमलेले अधिकारी महम्मद मोहसिन यांना निलंबित केले. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोहसिन हे १९९६च्या कर्नाटक कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. विशेष संरक्षण दलाचे कवच लाभलेल्या नेत्यांबाबत जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांची पायमल्ली या अधिकाऱ्याने केल्याचा आयोगाचा ठपका आहे. ज्यांना या दलाचे संरक्षण लाभते त्यांना वाहनाच्या तपासणीत सूट असते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावर अधिक तपशील देण्यास त्याने नकार दिला.
पंतप्रधान मंगळवारी ओदिशात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. मोहसिन यांनी पंतप्रधानांसाठीचे हेलिकॉप्टर तब्बल १५ मिनिटे रोखले आणि त्याची तपासणी केली. या प्रकाराने अधिकारी वर्गही आश्चर्यचकीत झाला होता. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर आयोगाने ही कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हेलिकॉप्टरची राऊरकेला येथे मंगळवारीच तपासणी केली होती. संबलपूर येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्याही हेलिकॉप्टरची भरारी पथकाकडून अशी तपासणी झाली. त्यामुळे भाजप वर्तुळातही खळबळ होती.