वृत्तसंस्था, शर्म अल-शेख
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा शांतता प्रस्ताव ही पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शेवटची संधी आहे असे मत इजिप्तचे अध्यक्ष अबेदल-फतेह अल सिसी यांनी सोमवारी नमूद केले. इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे आयोजित गाझा शांतता शिखर परिषदेत बोलताना सिसी यांनी ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा केली.
या परिषदेत गाझा शांतता करारावर इजिप्त, कतार आणि तुर्की आदी मध्यस्थ देशांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत स्वाक्षऱ्या केल्या. या परिषदेला भारतासह २०पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यजमान इजिप्तसह कतार आणि तुर्की या देशांनी युद्धसमाप्तीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले आहेत. शिखर परिषदेत सिसी यांनी उपस्थितांना संबोधित करताना पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकार असल्याचे निक्षून सांगितले. या भाषणादरम्यानच सिसी यांनी इजिप्तमधील ‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार ट्रम्प यांना प्रदान करत असल्याचे जाहीर केले.
इस्रायलच्या संसदेत भाषणाला प्रतिसाद
जेरुसलेम: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इस्रायलमध्ये पश्चिम आशियातील शांततेचा राग आळवला. ‘इस्रायलला दोन वर्षांच्या युद्धानंतर आता साध्य करण्यासारखे फारसे राहिलेले नाही, असे सांगतानाच इस्रायलने पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी काम केले पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी इस्रायलच्या नेसेटमध्ये (संसदेत) लोकप्रतिनिधींना केले. इस्रायल-हमास युद्धविरामाचा एक भाग म्हणून आवश्यक अटीची पूर्तता सोमवारी करण्यात आली. हमासने इस्रायलच्या २० ओलिसांची सुटका केली. इस्रायलनेही १९०० पॅलेस्टिनी युद्धकैद्यांची सुटका केली आणि गाझामध्ये मदतीचे रस्ते मोकळे केले. इस्रायलच्या लोकप्रतिनिधींनी ट्रम्प यांना सातत्याने उभे राहून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.