पीटीआय, न्यूयॉर्क : ‘ट्विटर’वरून प्रसृत होणाऱ्या मजकूर-आशयावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियामक मंडळ स्थापण्यात येईल. त्याद्वारे आशयासंदर्भातील मोठे निर्णय, तसेच एखाद्याचे ‘ट्विटर’ खाते पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती ‘ट्विटर’चे नवे मालक इलॉन मस्क यांनी दिली. हे नियमन कसे होईल, याचा तपशील मात्र मस्क यांनी अद्याप दिलेला नाही.

समाजमाध्यमांतील आघाडीची कंपनी ‘ट्विटर’चा ४४ अब्ज डॉलरचा अधिग्रहण व्यवहार पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मस्क यांनी ही माहिती दिली. ‘ट्विटर’कडून आशय नियामक मंडळ स्थापण्यात येणार आहे. यामध्ये विविधांगी दृष्टिकोन असलेल्या सदस्यांचा समावेश केला जाईल. तोपर्यंत ट्विटर खाती पुन्हा सुरू करणे, किंवा आशयासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार नाहीत, असे ‘ट्वीट’ ५१ वर्षीय मस्क यांनी शुक्रवारी केले. त्यांनी नमूद केले, की आम्ही अद्याप आशय नियामक धोरणांत कोणतेही बदल केलेले नाहीत.

‘ट्विटर’ची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच मस्क यांनी ‘ट्वीट’ची मालिकाच प्रसृत केली. ‘पक्षी’ आता मुक्त झाला आहे’, ‘विघ्नसंतोषी मंडळींनी सावध व्हावे’, ‘आता चांगला काळ आला आहे’, ‘स्वप्नपूर्ती अनुभवू’, ‘ट्विटर’वर आता विनोदांनाही परवानगी’ अशा आशयाची ही ‘ट्वीट’ मालिका मस्क यांनी प्रसृत केली. एप्रिलमध्ये ‘ट्विटर’चे अधिग्रहण करण्यास मान्यता देऊनही मस्क यांनी या करारातून बाहेर पडण्यासाठी अनेक महिने टाळाटाळ केली.  ‘ट्विटर’वरील अनेक बनावट खात्यांचे कारण कधी त्यांनी पुढे केले होते. तर कधी कंपनीच्या हितचिंतक जागल्यांनी   केलेल्या आरोपांचे कारण पुढे करत मस्क हा करार स्थगित करत होते.