Elon Musk Aptitute Test Result Viral: अवघ्या जगभरात अब्जावधींच्या संपत्तीमुळे चर्चेत असणारे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या लहानपणीचं एक निकालपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निकालपत्राची सत्यताही लगेच सिद्ध झाली असून हे निकालपत्र खुद्द त्यांच्या आईनं म्हणजेच माये मस्क यांनीच शेअर केलं आहे. त्यामुळे यातील श्रेणी ही खुद्द एलॉन मस्क यांचीच असल्याचं सिद्ध होत आहे. शिवाय, माये मस्क यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.
माये मस्क यांची एक्सवर पोस्ट
माये मस्क यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केली असून त्यासोबत एलॉन मस्क यांचा १७व्या वर्षी झालेल्या अॅप्टिट्युट टेस्टचा निकालही त्यांनी शेअर केला आहे. “जुने फोटो चाळताना मला १७ व्या वर्षी एलॉननं दिलेल्या कम्प्युटर अॅप्टिट्युट टेस्टचा निकाल सापडला. माझा अत्यंत हुशार मुलगा. मला त्याचा अभिमान आहे”, असं माये मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे फोटोमध्ये?
माये मस्क यांनी शेअर केलेला फोटो युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरियानं दिलेल्या गुणपत्रिकेचा आहे. ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर: इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट’ असा हे निकालपत्र देणाऱ्या अधिकार संस्थेचा उल्लेखही यात दिसत आहे. या निकालपत्रावर तारीख १७ मे १९८९ अशी आहे. एलॉन मस्क १७व्या वर्षी कॅनडाला स्थलांतरीत झाले होते. त्याआधी काही काळ ते युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरियामध्ये शिकत होते.
या निकालपत्रावर विद्यापीठाचे तत्कालीन संचालक जे. एल. एम. विचर्स यांची सहीदेखील आहे. तेव्हा एलॉन मस्क यांनी कम्प्युटर अॅप्टिट्युट टेस्टमध्ये ‘Outstanding’ दर्जाची कामगिरी केल्याचंही विचर्स यांनी यात म्हटलं आहे. एलॉन मस्क यांना कम्प्युटर ऑपरेटिंगमध्ये ‘A+’ आणि कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्येदेखील ‘A+’ श्रेणीचे गुण मिळाले होते.
एलॉन मस्क यांची सूचक प्रतिक्रिया
दरम्यान, एलॉन मस्क यांनी लागलीच आपल्या आईच्या पोस्टवर मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. “असं म्हणतात की मी तेव्हा इंजिनिअरिंग अॅप्टिट्युट टेस्टमध्ये त्यांनी कधीही पाहिले नव्हते इतके चांगले गुण मिळवले. कदाचित भविष्यात एखादं एआय यंत्र म्हणेल, ‘एका मनुष्यासाठी ही काही वाईट कामगिरी नाही”, असं मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एलॉन मस्क यांची शैक्षणिक कारकिर्द
युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरियामध्ये काही महिने शिकल्यानंतर एलॉन मस्क यांनी ओंटारियो येथील क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये १९९० साली प्रवेश घेतला. दोन वर्षांनंतर त्यांना युनिव्हर्सिट ऑफ पेनसिल्वानियामध्ये पाठवण्यात आलं. तिथे त्यांनी १९९५ पर्यंत शिक्षण घेतलं.