Elon Musk Father Errol visits Ram Mandir : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांचे वडील एरॉल हे त्यांच्या मुलीबरोबर बुधवारी अयोध्येत दाखल झाले. विमानतळावरून ते थेट राम मंदिरात गेले. तिथे त्यांनी विधीवत पूजा केली. एलॉन मस्क यांची बहीण अलेक्झेंड्रा यांनी देखील पूजा केली. एरॉल मस्क यांचा पिवळा कुर्ता-पायजमा, कपाळावर गंध, गळ्यात भगवा रुमाल (गमछा) असा भारतीय अवतार सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. बापलेक नवी दिल्लीवरून खासगी विमानाने अयोध्या विमानतळावर दाखल झाले होते. त्यांच्याबरोबर इतर १६ जण अमेरिकेहून भारतात आले आहेत.

राम मंदिरात पूजा केल्यानंतर एरॉल मस्क हनुमानगढीला गेले. तिथेही त्यांनी पूजा केली. यावेळी एरॉल व अलेक्झेंड्रा यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ते ४० मिनिटे राम मंदिरात, तर १५ मिनिटे हनुमानगढी येथे थांबले होते. त्यानंतर एरॉल मस्क म्हणाले, “मला खूप आनंद आहे की मी आज अयोध्येत आलो आहे. मी या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याची वाट बघू शकत नव्हतो”.

एरॉल मस्क भारत व भारताबद्दल भरभरून बोलले

दरम्यान, एरॉल यांनी विमानतळावर व राम मंदिरातील पूजा आटोपल्यावर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “भारत हे एक अद्भूत ठिकाण आहे. ज्यांना-ज्यांना शक्य होईल त्यांनी भारतात आलं पाहिजे. माझ्या देशातही हजारो भारतीय लोक राहतात. मला भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्यावं असं वाटतं. येथील लोक खूप प्रेमळ व दयाळू आहेत. मी इथे आतापर्यंत जितक्या लोकांना भेटलोय ती सगळीच चांगली माणसं होती. मला वाटतंय की भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी चांगले होतील.

वेद १४ हजार वर्षे जुने : एरॉल मस्क

एरॉल मस्क १ जून रोजी भारतात दाखल झाले आहेत. ते सहा दिवस भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीत दाखल झाल्यावर ते म्हणाले होते की “मी राम मंदिर पाहण्यासाठी खूपच उत्सूक आहे. भारताचा इतिहास अविश्वसनीय आहे. मला असं वाटतं की जगाचा इतिहास कोणत्या ना कोणत्या मार्गे भारताशी जोडलेला आहे. वेद १४ हजार वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते त्याही आधीचे आहेत. वेदांमध्ये उडणाऱ्या विमानांचा उल्लेख आहे. हे सगळं खूप आकर्षक व अविश्वसनीय असं आहे”.