Donald Trump and Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये नवीन टॅरिफ धोरण, बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, अमेरिकेतील कर्मचारी कपात, हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भातील मुद्दा अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. ट्रम्प सरकारमध्ये उद्योगपती इलॉन मस्क यांची देखील महत्वाची भूमिका असल्याचं मानलं जातं.
कारण ट्रम्प यांच्या सरकारमध्ये इलॉन मस्क यांच्यावर ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) या विभागाची देखील जबाबदारी आहे. पण असं असतानाच आता इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरं तर इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. मात्र, आता इलॉन मस्क यांनी आपण ट्रम्प प्रशासन सोडत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधून विशेष सरकारी कर्मचारी (SGE) म्हणून त्यांच्या भूमिकेतून पायउतार होत असल्याचं इलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे. या संदर्भातील माहिती इलॉन मस्क यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे. तसेच मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इलॉन मस्क यांनी काय म्हटलं?
“विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित कालावधी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मी आभार मानू इच्छितो की, त्यांनी अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिली. तसेच ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (DOGE) हे अभियान देखील कालांतराने अधिक बळकट होईल”, असा विश्वासही इलॉन मस्क यांनी व्यक्त केला आहे.
As my scheduled time as a Special Government Employee comes to an end, I would like to thank President @realDonaldTrump for the opportunity to reduce wasteful spending.
— Elon Musk (@elonmusk) May 29, 2025
The @DOGE mission will only strengthen over time as it becomes a way of life throughout the government.
डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष सरकारी कर्मचारी म्हणून केलं होतं नियुक्त
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारमध्ये इलॉन मस्क यांना विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र, आता त्यांचा विशेष सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची मुदत संपुष्टात आल्यामुळे इलॉन मस्क यांनी सरकारमधून त्यांच्या भूमिकेतून पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे.