Brad Sherman : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून जगासमोर मांडली. यासाठी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाची कॉपी करत पाकिस्तानेही वेगवेगळ्या देशांना त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, या अनुषंगाने पाकिस्तानच्या खासदारांना अमेरिकेच्या एका खासदारांनी दहशतवादावरून चांगलंच फटकालं आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळ नुकतंच अमेरिकेत गेलं होतं. तेव्हा या पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकेतील एका खासदारांनी चांगलेच खडेबोल सुनावल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलं आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांचा नायनाट केला पाहीजे, त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलले पाहिजेत. तसेच पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरोधात निर्णायक कारवाई केली पाहिजे. कारण ही संघटना पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येसाठी जबाबदार आहे, असं ब्रॅड शेरमन यांनी म्हटलं आहे. याबाबत ब्रॅड शेरमन यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
तसेच पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाला संपवण्यासाठी आणि प्रदेशातील दहशतवादाशी लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचंही ब्रॅड शेरमन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २००२ मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर डॅनियल पर्ल यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणात दहशतवादी उमर सईद शेखला दोषी ठरवण्यात आलं होतं.
दरम्यान, ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, “ख्रिश्चन, हिंदू आणि अहमदिया मुस्लिम यांना हिंसाचार, छळ, भेदभाव किंवा असमानतेच्या भीतीशिवाय त्यांच्या श्रद्धेचे पालन करण्याची आणि लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे”, असंही ब्रॅड शेरमन यांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानी डॉक्टर डॉ.शकील आफ्रिदीची सुटका करण्याची मागणी देखील ब्रॅड शेरमन यांनी केली आहे.