Engineer Death : एका ३० वर्षीय महिला इंजिनिअरने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बिलं मंजूर करण्याचा दबाव सहन न झाल्याने आयुष्य संपवलं आहे. ही महिला इंजिनिअर आसामच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होती. तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला. ज्योतिशा दास असं या महिला इंजिनिअरचं नाव आहे. वाढीव रक्कम असलेली आणि घोटाळा असलेली बिलं मंजूर करुन पाठव असा दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाकल्याने आपण आयुष्य संपवत आहोत असं ज्योतिशा दासने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक हस्तलिखित सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये ज्योतिषाने हे ठळकपणे नमूद केलं आहे की तिला दोन वरिष्ठ अधिकारी खोटी बिलं पास करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यांचा दबाव सहन न झाल्याने मी आयुष्य संपवते आहे असं तिने म्हटलंय. जे काम पूर्णच झालेलं नाही त्यासंदर्भातली बिलं आणि वाढीव रक्कम मंजूर करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात होता असंही ज्योतिशाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी ज्योतिशाच्या आत्महत्या प्रकरणात दोघांना केली अटक
ज्योतिशा दासने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की मी माझ्या कार्यालयातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे प्रचंड तणावाखाली आहे. मला माझ्या कार्यालयात याबाबत मार्गदर्शन करणारं कुणीही नाही. माझे आई वडीलही चिंतेत आहेत. मी त्यामुळेच हे टोकाचं पाऊल उचलत आहे. मी माझ्या परिने सगळे प्रयत्न केले पण मी त्या दोघांना थांबवू शकत नाही. त्यांच्याकडून माझ्यावर सातत्याने बिलं मंजूर कऱण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. अशी माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी दीनेश आणि अमिनुल या दोघांवर गुन्हा नोंदवला आहे. तसंच या दोघांना या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. ही बिलं कुठली आहेत? ती किती रकमेची आहेत? त्यासाठी नेमकं हे दोघं कशा प्रकारे ज्योतिशावर दबाव टाकत होते? या सगळ्याची माहिती पोलीस घेत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या प्रकरणाची घेतली दखल
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा सूचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोलिसांनी असं म्हटलं आहे की आम्ही या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासून पाहतो आहोत. तसंच ज्योतिशाचा मृतदेह आम्ही शवविच्छेदनासाठी पाठवल्याचंही पोलिसांनी सांगितलं.