बेन स्टोक्सने तिन्ही आघाडय़ांवर केलेली शानदार कामगिरी तसेच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि लियाम प्लंकेट यांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ३१२ धावांचे आव्हान पेलताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २०७ धावांवर संपुष्टात आणत यजमान इंग्लंडने विजयी सलामी नोंदवली.

क्विंटन डी’कॉक आणि हाशिम अमला यांच्याकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर जायबंदी होऊन अमला पॅव्हेलियनमध्ये परतला. फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीवर डी’कॉकला ५ धावांवर असताना जीवदान मिळाले. या जीवदानाचा लाभ उठवत डी’कॉकने खेळपट्टीवर ठाण मांडले. पण एडीन मार्कराम (११) आणि कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस (५) स्वस्तात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ अडचणीत सापडला. डी’कॉक आणि हास्सी व्हॅन डर डुसेन यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८५ धावांची भागीदारी रचली. लियाम प्लंकेटने ६८ धावांवर डी’कॉकची खेळी संपुष्टात आणल्यानंतर व्हॅन डर डुसेनने अर्धशतक साजरे केले. पण तोही माघारी परतल्यानंतर आफ्रिकेचा डाव अवघ्या २०७ धावांत कोलमडला आणि इंग्लंडने १०४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

त्याआधी, सुरुवातीच्या धक्क्यानंतर जेसन रॉय आणि जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरल्यानंतर बेन स्टोक्स आणि कर्णधार ईऑन मार्गन यांनी शतकी भागीदारी रचली. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी साकारल्यानंतरही त्यांना सलामीच्या सामन्यात ८ बाद ३११ धावांपर्यंतच मजल मारता आली.

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांनी अधिकृतपणे विश्वचषकाचे अनावरण केल्यानंतर इंग्लंडला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. लेगस्पिनर इम्रान ताहिरने आपल्या गुगली चेंडूच्या जाळ्यात जॉनी बेअरस्टोला फसवले. खातेही न खोलता यष्टीरक्षक क्विंटन डी’कॉककडे झेल देऊन बेअरस्टो माघारी परतला. त्यानंतर रॉय आणि रूट यांनी इंग्लंडची पडझड होऊ दिली नाही. या दोघांनीही आपापली अर्धशतके साजरी केली. पण १ बाद १०७ अशा स्थितीतून इंग्लंडने दोघांचाही बळी गमावला.

अँडिल फेकुल्वायो याने जेसन रॉयचा (५४) अडसर दूर केल्यानंतर पुढच्याच षटकात कॅगिसो रबाडाने रूटला (५१) माघारी पाठवले. दोन फलंदाज झटपट गमावल्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि स्टोक्स यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी १०६ धावांची भागीदारी रचत इंग्लंडला सुस्थितीत आणले. मात्र मॉर्गन (५७) बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्टोक्सने एक बाजू लावून धरताना ७९ चेंडूंत ९ चौकारांसह ८९ धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने अखेरच्या क्षणी तीन बळी मिळवत छाप पाडली.

अन् बेल्स उडालीच नाही!

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात एक वेगळेच नाटय़ पाहायला मिळाले. ११व्या षटकांत फिरकीपटू आदिल रशीदने गुगली चेंडू टाकत क्विंटन डी’कॉकला चकवले. चेंडूने यष्टय़ांचा वेध घेतला. त्यात बसवण्यात आलेले दिवे प्रज्वलित झाले, पण बेल्स उडालीच नाही. हा प्रकार पाहून रशिदसह यष्टीरक्षक जोस बटलर आणि पंचही हैराण झाले. पंचांनी नंतर बेल्स उचलून पाहिल्या, पण त्यांनाही नेमके काय घडले, हे समजले नाही. ५ धावांवर असताना मिळालेल्या या अनोख्या जीवदानाचा फायदा उठवत डी’कॉकने ६८ धावांची खेळी केली.

ताहिरचा असाही विक्रम..

दक्षिण आफ्रिकेचा लेग-स्पिनर इम्रान ताहिरने गुरुवारी विश्वचषक स्पर्धेत एक आगळा विक्रम साकारला. विश्वचषकातील पहिले षटक टाकण्याचा मान मिळवणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने ताहिरकडे चेंडू सोपवला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने जॉनी बेअरस्टोला (०) बाद करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. याआधी न्यूझीलंडचा ऑफ-स्पिनर दीपक पटेलने १९९२च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे षटक टाकले होते. ताहिर हा (४० वर्षे ६४ दिवस) विश्वचषकात खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.