Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. ट्रम्प घेत असलेल्या निर्णयांची जगात चर्चा सुरू आहे. असं असतानाच सध्या संयुक्त राष्ट्रांचं महासभा अधिवेशन सुरू आहे. यासाठी विविध देशांचे प्रमुखही अमेरिकेत दाखल झालेले आहेत. या दरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प हे जात असताना अचानक सरकता जिना (Escalator) बंद पडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या रिअॅक्शनची आणि प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे जात असताना अचानक सरकता जिना (Escalator) बंद पडला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे संतापल्याची रिअॅक्शन दिली. मात्र, ट्रम्प यांनी पाऊल ठेवल्यानंतर अचानक सरकता जिना का थांबला? याच्या चौकशीची मागणी आता व्हाईट हाऊसने केली आहे.

दरम्यान, प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या घटनेला अस्वीकार्य म्हटलं आहे. तसेच ही कोणाची चूक नसेल. पण जर कोणी जाणूनबुजून सरकता जिना थांबवला असेल तर कारवाई झाली पाहिजे आणि त्वरित चौकशी केली पाहिजे”, असं कॅरोलिन लेविट यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भाषणावेळी टेलीप्रॉम्प्टरही बंद पडला

ट्रम्प आणि मेलानिया अ‍ॅक्सिलरेटरवर चढत असताना सरकता जिना बंद पडला. त्यानंतर आणखी एका घटनेची चर्चा सुरू आहे. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करत होते तेव्हा त्यांच्या समोरील टेलिप्रॉम्प्टर अचानक बंद पडल्याचं पाहायला मिळालं. यानंतर ट्रम्प यांनी मिश्किल टिप्पणी केली. “जो कोणी हे टेलीप्रॉम्प्टर चालवत असेल तो मोठ्या संकटात सापडेल”, असं त्यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हटलं की, “संयुक्त राष्ट्रांकडून मला या दोन गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे अ‍ॅक्सिलरेटर (सरकता जिना) जो वर जाताना अगदी मध्यभागी थांबला. दुसरं म्हणजे टेलिप्रॉम्प्टर काम करत नव्हता. तोही अचानक बंद झाला. या दोन गोष्टी मला मिळाल्या”, असं मिश्किलपणे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं की, “अ‍ॅक्सिलरेटरची सुरक्षा यंत्रणा अध्यक्षांच्या पुढे असलेल्या एखाद्या व्यक्तीने अनवधानाने सुरू केली होती आणि काही मिनिटांतच ती रीसेट करण्यात आली. तसेच टेलिप्रॉम्प्टरसंदर्भात आम्हाला काहीही बोलायचं नाही. कारण अमेरिकन अध्यक्षांसाठी टेलिप्रॉम्प्टर व्हाईट हाऊसद्वारे चालवला जातो”, असं त्यांनी म्हटलं.