Newborn abandoned in Rajasthan: राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मांडलगढ परिसरातील सीताकुंड जंगलात १५ दिवसांचे एक नवजात बाळ दगडांखाली आढळून आले. लहान बाळाच्या तोंडात दगडं भरून वरून फेविक्विक लावण्यात आले होते. तरीही बाळ रडत होते, त्याचा दबका आवाज ऐकून एक गुराखी तिथे पोहोचला आणि त्याने बाळाला बाहेर काढलं. १० ते १५ दिवसांपूर्वी या जगात आलेल्या इवल्याशा बाळाला त्याचे मरण्यासाठी सोडून गेले असले तरी चमत्कारीकरित्या बाळाचा जीव वाचला आहे.
रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून फेविक्विक लावलं
मंगळवारी दुपारी सीताकुंड जंगल परिसरात एक गुराखी आपली जनावरी चरण्यासाठी घेऊन गेला होता. तिथे त्याला दगडांच्या ढिगाऱ्यातून बारीक रडण्याचा आवाज येत होता. त्याने जवळ जाऊन पाहिले तर दगडांमध्ये एक नवजात बाल ठेवलेले दिसले. गुराख्याने दगड बाजूला करून बाळाला बाहेर काढले.
बाळ जिवंत असल्याचे कळताच गुराख्याने जवळच मंदिरात बसलेल्या ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने बाळावर आता उपचार सुरू आहेत. पण ज्या अवस्थेत हे बाळ सापडले, ते पाहून ग्रामस्थ आणि पोलिसांनाही धक्का बसला.
फेविक्विकचे पाऊचही आढळले
ज्याठिकाणी दगडांमध्ये बाळ आढळले त्याच ठिकाणी काही अंतरावर फेविक्विकचे पाऊच आढळून आले. बाळाचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून त्याच्या तोंडात दगडे भरून फेविक्विकने तोंड चिपकविण्यात आले होते.
पोलिसांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बाळाला बिजौलियाच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे समजल्यानंतर त्याला भीलवाडाच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, बाळाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र दगड गरम झाल्यामुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग भाजला गेला आहे.
पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
