Ex-CIA official John Kiriakou says US expected India-Pakistan war after 2001 Parliament attack : माजी सीआयए अधिकारी जॉन किरियाकू (John Kiriakou) यांनी भारत आणि पाकिस्तान तणावाच्या संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, २००१ मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव वाढला होता. विशेषतः जेव्हा ‘ऑपरेशन पराक्रम’ अंतर्गत सीमेवर मोठी सैन्य तैनाती करण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली. याबाबत CIA चे माजी अधिकारी जॉन किरियाकौ यांनी खुलासा केला की, हा तणाव पाहून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांना वाटले होते की, हे अण्वस्त्र सज्ज असलेले दोन देश, भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू करण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. .

किरियाकौ यांनी सीआयएमध्ये १५ वर्ष अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांनी नुकतेच वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानात कार्यरत असलेले CIA अधिकाऱ्यांना दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता वाटू लागल्याने त्यांनी आपल्या कुटुंबीयांना तिथून बाहेर काढले. संघर्षग्रस्त भागातून CIA अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना बाहेर काढणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

तसेच किरियाकौ यांनी इस्लामाबाद येथील अमेरिकन दूतावासातील रिकामा कॅफेटेरिया पाहूण आश्चर्यचकित झालेल्या एका महिला CIA अधिकाऱ्याशी झालेल्या संभाषणची आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली. “मी म्हणालो की, त्यांना बाहेर काढण्यात आले आहे कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध पेटू शकते,” असे किरियाकू म्हणाले. तसेच त्यांनी त्या महिला अधिकाऱ्याला पार्किंग मधील हेलिकॉप्टरकडे निर्देश करत सांगितले की ते त्यांच्या बचावण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

“पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेनं विकत घेतलं होतं आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चावी अमेरिकेकडे होती. परवेझ मुशर्रफ हे त्यावेळी दुहेरी भूमिका वठवायचे. एकीकडे ते अमेरिकेला दहशतवादाविरुद्ध सहकार्य करण्याचं आश्वासन देत होते, तर दुसरीकडे ते पाकिस्तानी सैन्य आणि इतर दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध सक्रिय ठेवत असत”, असा दावा देखील जॉन किरियाकौ यांनी केला आहे.

किरियाकौ यांनी दावा केला की, “जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेला पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, “मी २००२ मध्ये पाकिस्तानमध्ये तैनात असताना, मला अनधिकृतरित्या सांगण्यात आले होते की, पेंटागॉन पाकिस्तानच्या अणुशस्त्रांवर नियंत्रण ठेवतो, मुशर्रफ यांनी अमेरिकेकडे त्याचे नियंत्रण सोपवले आहे कारण त्यांना तुम्ही जे सांगितले त्याचीच (अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील) भीती होती,” असे किरियाकौ म्हणाले.