जगातील इंटरनेट सेवा सुधारण्यासाठी लेसर, ड्रोन, उपग्रह यांचा वापर करण्यासाठी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी कनेक्टिव्हिटी लॅब सुरू केली आहे. या योजनेमुळे जमिनीवर, हवेत व कक्षेत असे इंटरनेटचे नवे मंच सुरू करता येतील, असे झुकेरबर्ग यांनी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर म्हटले आहे. फेसबुकने नासा, द नॅशनल ऑप्टिकल अॅस्ट्रॉनॉमी ऑब्झव्र्हेटरी व अॅसेंटा ही ब्रिटिश कंपनी यांच्याशी करार केला आहे. अॅसेंटा कंपनी सौरऊर्जेवर चालणारी ड्रोन विमाने तयार करण्यात आघाडीवर आहे. हे वैज्ञानिक ड्रोन विमाने तयार करणार असून त्यामुळे उपसागरी भागात जास्त उंचीवर इंटरनेट सेवा मिळू शकेल. कमी घनतेच्या भागात उपग्रहामार्फत इंटरनेट सुविधा दिली जाईल. फेसबुकने या आठवडय़ाच्या प्रारंभी ड्रोन निर्माती टायटन कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ही कंपनी नवीन योजनेत सामील आहे की नाही हे समजू शकले नाही. नवीन प्रयत्नांची सविस्तर माहिती झकरबर्ग यांनी यात दिलेली नाही. इंटरनेट डॉट ओआरजीने ३० लाख लोकांना फिलिपिन्स व पॅराग्वेत इंटरनेट सेवा दिली असून मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.जर संपूर्ण जग इंटरनेटने जोडायचे असेल तर नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे, असे झकरबर्ग यांनी कनेक्टिव्हिटी लॅबच्या घोषणेनंतर सांगितले. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रोजेक्ट लिंक जाहीर करून विकसनशील जगात इंटरनेट सेवेची घोषणा केली होती. गुगलने इंटरनेटच्या प्रसारासाठी प्रोजेक्ट लून जाहीर केला होता, त्यात गरम हवेचे बलून दूरवर सोडण्याची कल्पना मांडली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
ड्रोनवर आधारित इंटरनेटसाठी झुकेरबर्ग यांची कनेक्टिव्हिटी लॅब सुरू
जगातील इंटरनेट सेवा सुधारण्यासाठी लेसर, ड्रोन, उपग्रह यांचा वापर करण्यासाठी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी कनेक्टिव्हिटी लॅब सुरू केली आहे.

First published on: 01-04-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook internet org launch connectivity lab