फेसबुकने योग्य वेळी पाठवलेल्या अलर्टमुळे आणि दिल्ली पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. दिल्लीच्या पालम गावातील एका व्यक्तीने ४ जून रोजी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पालम गावात राहणाऱ्या या व्यक्तीला दिल्लीच्या एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने हाताच्या नसा कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेलं होतं. यानंतरही पोलिसांनी योग्यवेळी रुग्णालयात दाखल केल्याने त्याला वाचवता आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस अधिकाऱ्यांनुसार आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती मिठाईच्या दुकानात काम करतो. २०१६ मध्ये पत्नीच्या मृत्यूपासूनच तो अस्वस्थ झाला होता. त्याला दोन मुले आहेत. शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. पोलिसांनी धाव घेत त्याचा शोध घेतल्याने त्याचा जीव वाचवता आला

आत्महत्या करताना करत होता फेसबुक लाईव्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे शेजाऱ्यांसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार त्या व्यक्तीच्या मनात आला. त्याने फेसबुक लाईव्ह सुरु करत आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने फेसबुक लाईव्ह सुरु केले. त्यावेळी अमेरिकेतील फेसबुकच्या कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांनी हा प्रकार पाहिला आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाला (cyPAD) ला ही माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत त्या व्यक्तीचे जीव वाचवला.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने दखल घेत आणि अकाऊंट डिटेल्सची तपासणी केली. फेसबुक अकाऊंटवर असणाऱ्या क्रमांकाशी संपर्क साधण्यात आला मात्र तो बंद होता. यानंतर पोलिसांनी त्या मोबाइल नंबरची संपूर्ण माहिती मिळवली. पोलिसांना ती व्यक्ती पालम येथील असल्याचे समजले. त्यानंतर जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ती व्यक्तीचे बरेच रक्त वाहून गेले होते. पोलिसांनी त्याला तातडीने एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले आणि वेळेवर उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live was attempting suicide delhi police save lives as us authorities issue alert abn