Far Right Populists in Fake News: फेक न्यूज हे हल्ली आपल्या सर्वांसमोरचं एक मोठं आव्हान होऊन बसलं आहे. कोणतीही गोष्ट आपल्या मोबाईलपर्यंत अगदी विनासायास पोहचवण्याचे असंख्य मार्ग सध्याच्या काळात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचणारी किंवा पोहोचवली जाणारी कोणती गोष्ट खरी आहे आणि कोणती गोष्ट बनावट आहे अर्थात फेक आहे, हे ठरवणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. अशा सगळ्या गोष्टींपैकी सध्या सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक धोकादायक ठरणारी बाब म्हणजे फेक न्यूज. याच फेक न्यूजबाबत करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासाचे निष्कर्ष सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहेत अभ्यासाचे निष्कर्ष?

दी गार्डियननं या अभ्यासासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अॅमस्टरडॅममधील पीटर टॉर्नबर्ग व फ्री युनिव्हर्सिटीच्या जुलियाना शूएरी यांनी संयुक्तपणे केलेल्या या अभ्यासात फेक न्यूज आणि त्या पसरवणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून त्यांनी काढलेला निष्कर्ष असा:

‘कट्टर उजव्या विचारसरणीचे लोकानुनयी राजकारणी लोकशाही व्यवस्था डळमळीत करण्यासाठी आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी चुकीच्या किंवा खोट्या माहितीचा एक साधन म्हणून वापर करतात. ही मंडळी सोशल मीडियावर कट्टर डाव्या राजकीय नेत्यांपेक्षा जास्त फेक न्यूज पसरवतात’.

यासंदर्भात शोधनिबंधाचे सहअभ्यासक पीटर टॉर्नबर्ग यांच्यानुसार, “या अभ्यासाचे निष्कर्ष फार महत्त्वाचे आहेत. धोरणकर्ते, संशोधक आणि लोकांनी फेक न्यूजशी निगडित सर्व बाबी समजून घेणं आणि त्याहून अधिक कट्टर उजव्यांची कार्यपद्धतीन समजून घेणं अत्यावश्यक बनलं आहे, ही गरज या निष्कर्षांमधून अधोरेखित होत आहे”.

कसा केला अभ्यास..कसा काढला निष्कर्ष?

पीटर टॉर्नबर्ग आणि जुलियाना शुएरी यांनी या अभ्यासासाठी २०१७ ते २०२२ या काळात तेव्हाच्या ट्विटरवर पोस्ट झालेले जवळपास ३.२ कोटी ट्वीट अभ्यासले! एकूण २६ देशांमधील ८ हजार १९८ खासदारांनी हे ट्वीट केले होते. या देशांमध्ये ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, स्वीडन या प्रमुख युरोपियन राष्ट्रांप्रमाणेच यूके, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील खासदारां किंवा त्या त्या देशातील लोकप्रतिनिधी सभागृहातील सदस्यांच्या ट्वीट्सचा समावेश आहे. यासाठी हे सदस्य ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षांची विचारसरणी व त्यांच्या लोकप्रियतेबाबत उपलब्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय डाटाबेसमधील माहितीचा संदर्भ घेण्यात आला.

यानंतर अभ्यासकांनी फॅक्टचेकिंग आणि फेक न्यूज ट्रॅकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून तब्बल ६ लाख ४६ हजार ०५८ लिंक्सचा डेटा तयार केला. या प्रत्येक लिंक्सच्या सत्यतेसंदर्भातलं त्यांचं मूल्यांकन या डेटाबेसमध्ये होतं. यानंतर अभ्यासकांनी या सगळ्या लिंक्सची तुलना या लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सदस्यांनी शेअर केलेल्या १ कोटी ८० लाख लिंक्सशी केली.

शेअर केलेल्या लिंकवरून सदस्य व पक्षाचा आढावा

या तुलनेनंतर अभ्यासकांच्या हाती प्रत्येक लोकप्रतिनिधीनं शेअर केलेल्या प्रत्येक बातमीच्या लिंकच्या सत्यासत्यतेची आकडेवारी तयार झाली. या आकडेवारीच्या आधारे अभ्यासकांनी संबंधित सदस्यांचं आणि त्यांच्या पक्षाच्या सत्यता मूल्यांनाची यादी तयार केली.

या मूल्यांकनानुसार, कट्टर उजव्या विचारसरणीच्या सदस्यांकडून फेक न्यूज पसरवण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला जातो. उजव्या आणि डाव्या टोकांच्या विचारसरणीच्या पट्टीवरील मध-उजवे, मध्य-डावे आणि कट्टर डावे हे फेक न्यूज पसरवण्याच्या या प्रक्रियेत अभावानेच आढळतात,असा निष्कर्ष काढण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Far right politicians spreading more fake news than far left research concludes pmw