कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. मंगळवारी ( ३० मे ) कुस्तीपटू आंदोलकांनी आपली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कुस्तीपटू उत्तराखंडमधील हरिद्वार येथील गंगातीरी पोहचले होते. पण, शेतकरी नेत्यांनी मध्यस्ती केल्यानंतर कुस्तीपटूंनी आपला निर्णय मागे घेतला आहे. यावेळी शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला इशाराही दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी सायंकाळी पदकं घेऊन कुस्तीपटू हरिद्वार येथे पोहचले होते. “सरकार आमचं ऐकूनही घेत नाही. तसेच, आरोपी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरही कारवाई करण्यात तयार नाही. मग देशासाठी जिंकलेली पदकं कोणत्या कामाची? ही पदकं आम्ही गंगेत विसर्जित करण्यासाठी आलो,” असं कुस्तीपटूंनी सांगितलं. विनेश फोगाट, बजरंग पुनिया, संगीता फोगाट, साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू हरिद्वार येथे पोहचले होते. यावेळी साक्षी मलिक आणि विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले आहेत.

यानंतर शेतकरी नेते नरेश टिकैत हरिद्वार येथे आले. त्यांनी समजूत काढत कुस्तीपटूंची पदकं आपल्या ताब्यात घेतली. तेव्हा नरेश टिकैत यांनी केंद्र सरकारला पाच दिवसांचा वेळ दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारवरून दिल्लीला पोहचल्यावर कुस्तीपटू इंडिया गेट येथे उषोषणाला बसण्याच्या तयारीत आहे. पण, इंडिया गेट अथवा परिसरात उपोषण किंवा आंदोलन करण्यास कोणतीही परवानगी नाही, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

“सरकार एका माणसाला ( ब्रिजभूषण सिंह ) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी ( ३१ मे ) याप्रकरणी खाप पंचायत बोलवण्यात आली आहे,” अशी माहिती नरेश टिकैत यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader naresh tikait arrives in haridwar where wrestlers have gathered to immerse their medals in river ganga ssa