Farooq Abdullah sings bhajan : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला कठडा येथील एका कार्यक्रमात माता शेरावालीचं भजन गाताना दिसले आहेत. अब्दुल्ला यांना माता शेरावालीचं भजन गाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या भजनाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अब्दुल्ला यांनी कटडा येथील रोपवेच्या उभारणीसाठी चालू असलेल्या कार्यक्रमावेळी लोकांना संबोधित केलं. यावेळी अब्दुल्ला म्हणाले, “माता वैष्णोदेवी मंदिराच्या नियोजनाचं कामकाज पाहणाऱ्या लोकांनी अशा गोष्टींपासून दूर राहायला हवं ज्यामुळे सामान्यांना त्रास होईल. जनसामान्यांची कुठेही गैरसोय होऊ नये”. दरम्यान, कटडामधील एका आश्रमात भजनाचा कार्यक्रम चालू होता. अब्दुल्ला त्या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात भजन गायक व लहान मुलं मिळून देवीची भजनं व आरती गात होते. यावेळी फारुक अब्दुल्ला यांनी माइक हातात घेतला आणि “तू ने मुझे बुलाया शेरावालिये, मैं आया मैं आया शेरावालिये…” हे भजन गायलं. फारुक अब्दुल्ला यांचा भजन गातानाचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोपवे योजनेविरोधात कठडामधील रहिवाशांच्या आंदोलनाला अब्दुल्ला यांनी पाठिंबा दर्शवला. “मंदिराचं नियोजन व व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांनी स्थानिक रहिवाशांच्या हितांचं रक्षण करावं. त्यांच्या हिताला बाधा पोहोचेल किंवा त्यांच्यासमोर समस्या निर्माण होतील अशी कोणतीही कृती करू नये”, असं म्हणत अब्दुल्ला यांनी मंदिर व्यवस्थापनाने स्थानिकांच्या हिताचा विचार न करता रोप वे बांधल्याची टीका देखील यावेळी केली.

फारुक अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले?

अब्दुल्ला म्हणाले, “स्थानिक रहिवाशांनी साहस दाखवलं आणि मोठ्या हिंमतीने लढा दिला. त्यांनी दाखवून दिलं की सत्ता सरकारकडे नसून जनतेच्या हातात आहे आणि सरकारच्याही लक्षात आलंय की ही जनता स्वस्थ बसणारी नाही. जनतेकडे सरकार बनवण्याची व सरकार पाडण्याची शक्ती आहे. आता अधिकारी रहिवाशांशी रोपवेबाबत चर्चा करू लागले आहेत. ते विचारत आहेत की रोपवे बनवायला हवा की नको”.

“मला काही माहिती नाही”, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत अब्दुल्लांचं वक्तव्य

बांगलादेशमधील सत्तांतरानंतर तिथल्या अल्पसंख्याकांवरील अत्याच्याराच्या, त्यांच्याविरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमं देखील सातत्याने त्याची दखल घेत आहेत. भारतातील नेते तिथे होत असलेल्या घटनांचा निषेध करताना दिसतायत. दुसऱ्या बाजूला नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी फारुक अब्दुल्ला यांना बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात होत असलेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया विचारली असता फारुक अब्दुल्ला म्हणाले, “मी काही ऐकलं नाही, मला काही माहिती नाही”. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farooq abdullah sings bhajan tune mujhe bulaya sherawaliye in katra jammu kashmir asc