बंदी घातलेली असतानाही उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत प्रचारसभेत भाषण केल्याबद्दल भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी उमेश सिन्हा यांनी लखनौमधील जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. त्याचबरोबर आदित्यनाथ यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंगही निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.
बंदीचा आदेश मोडत आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनौमध्ये प्रचारसभा घेतली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारवर धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप केला. ठाकूरद्वार, मैनपूरी येथे आपल्याला निवडणुकीनिमित्त सभा घेण्यास विरोध करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या मोबाईलवरून एका सभेला मार्गदर्शन केले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीसांना आदित्यनाथ यांना लखनौमध्ये बैठक घेण्यास परवानगी नाकारली. मात्र, तो आदेश धुडकावून लावत त्यांनी इंदिरा नगर भागात सभा घेतली. या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. समाजवादी पक्षाच्या सांगण्यानुसार जिल्हा प्रशासन आपल्याला प्रचारसभा घेऊ देत नसल्याचा आरोप आदित्यनाथ यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against yogi adityanath for defying ban on poll meeting