SMS Hospital Fire: राजस्थानच्या जयपूरमधील सवाई मानसिंह (एसएमएस) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यस्थानमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जयपूरमधील एसएमएस रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागल्यानंतर रुग्णांची एकच धावपळ उडाली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे रुग्णालयात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तसेच आग लागल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी मदत करण्याऐवजी बाहेर पळून गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या आगीच्या घटनेत रुग्णालयातील विविध साहित्य, कागदपत्रे, आयसीयू उपकरणे व इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

ट्रॉमा सेंटरच्या प्रभारींनी काय म्हटलं?

रुग्णालयात आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरचे प्रभारी धाकड यांनी म्हटलं की, “दुसऱ्या मजल्यावर दोन आयसीयू होते. एक ट्रॉमा आयसीयू होता, त्यामध्ये ११ रुग्ण होते आणि एक सेमी आयसीयू होता ज्यामध्ये १३ रुग्ण होते. ट्रॉमा आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्यानंतर काही क्षणात आग पसरली.”

मुख्यमंत्री शर्मा यांनी घेतली घटनेची दखल

“सहा रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. आम्ही पूर्ण प्रयत्न केले. मात्र,आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. मृतांपैकी दोन महिला आणि चार पुरुष होते. इतर पाच रुग्णांची प्रकृती गंभीर आहे”, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच घटनेनंतर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मंत्री जोगाराम पटेल आणि मंत्री जवाहर सिंह बेधम यांनी ट्रॉमा सेंटरला भेट दिली. तेव्हा रुग्णांच्या कुटुंबियांनी आगीच्या वेळी रुग्णालयातील कर्मचारी मदत करण्याऐवजी बाहेर पळून गेल्याचा आरोप केला.

रुग्णांच्या कुटुंबियांनी काय म्हटलं?

“आम्हाला धूर दिसला आणि आम्ही ताबडतोब कर्मचाऱ्यांना कळवलं, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आता आमच्या रुग्णांच्या स्थितीबाबत कोणीही आम्हाला काहीही सांगत नाही”, असा आरोप एका कुटुंबीयांनी केला आहे. एएनआयशी बोलताना दुसऱ्या एका पीडितेच्या नातेवाईकाने म्हटलं की, “आयसीयूमध्ये आग लागली. पण त्यानंतर आग विझवण्यासाठी कोणतंही उपकरण नव्हतं.अग्निशामक यंत्र नव्हतं, आग विझवण्यासाठी पाणीही नव्हतं. तिथे कोणत्याही सुविधा नव्हत्या, या घटनेत माझी आई वाचली नाही.”